दिवाळीच्या शुभेच्छा

सध्या आपल्या देशामध्ये महागाई फारच वाढली आहे. जी ती गोष्ट विकत घ्यायला जावे तर भलतीच किंमत वाढलेली असते. सगळ्याच गोष्टी महाग झाल्या असल्या तरी अजून तरी शुभेच्छा महाग झालेल्या नाहीत. अंतःकरणापासून आणि सात्त्विक मनाने एकमेकांना शुभेच्छा देण्यावर सरकारने फारसा कर लावलेला नाही. त्यामुळे आपण दिवाळीच्या निमित्ताने एकमेकांना शुभेच्छा देऊ या. परिस्थिती प्रतिकूल आहे. विशेषतः दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी जी स्वस्थता आणि समाधान हवे असते ते म्हणावे तसे मिळत नाही.

सार्वजनिक आणि राष्ट्रीय जीवनामध्ये मनाला अस्वस्थ करणार्याा काही घटना घडत आहेत. आपल्या जीवनाचे नियंत्रण संत सज्जनांनी करायला हवे. परंतु आपल्या जीवनाच्या सगळ्याच नाड्या राजकीय पुढार्यांडच्या हातात गेलेल्या आहेत. बहुसंख्य राजकीय नेते स्वार्थी हेतूने राजकारणात आलेले असल्यामुळे तेच समाजाचे नियंत्रण आणि दिग्दर्शन राष्ट्रीय भावनेतून करत नसून स्वतःच्या स्वार्थाला पोषक ठरेल अशा पद्धतीने करत आहेत. त्यांचे बोलणे, वागणे आणि निर्णय घेणे या सगळ्यामध्येच एक दिशाहीनता दिसायला लागली आहे.

सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी काल दिल्लीत बोलताना एक खंत व्यक्त केली की, देशाला व्यापून राहणारे राष्ट्रीय नेतृत्व राहिलेले नाही आणि ही गोष्ट खरी आहे. साधारणपणे देशाचा विचार करणार्याख प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये आपल्या राष्ट्रीय जीवनातला हा वैचारिक नेतृत्वाचा अभाव ठसठसणार्यात जखमेसारखा जाणवत आहे आणि हीच ठसठस अण्णा हजारे यांनी नेमक्या एका वाक्यात प्रकट केली आहे. गेल्या शतक दीड शतकामध्ये भारत देशाने प्रगतीची मोठी झेप घेतलेली आहे. देश स्वतंत्र झाला तेव्हा या देशाचे जे स्वरूप होते ते स्वरूप पाहिल्यानंतर कोणताही राष्ट्रीय नेता बावचळून गेला असता.

या देशात अक्षराचा गंध असलेले केवळ चार टक्के लोक होते. ९६ टक्के लोक अंगठेबहाद्दर होते. दारिद्र्य रेषेखालील जीवन जगणार्यांअची संख्याही तेवढीच होती. देशवासियांच्या पोटाला पुरेल एवढे धान्य देशात पिकत नव्हते. नुकतीच फाळणी झाल्यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडलेले होते. त्यातच महात्मा गांधींची हत्या झाल्यामुळे देश हादरलेला होता. पण त्या काळामध्ये नेहरू आणि वल्लभभाई पटेल अशा नेत्यांनी खरोखरच मोठ्या धारिष्ट्याने या देशाच्या भवितव्याला असा काही आकार दिला की, देशाची उभारणी सावकाशीने का होईना पण होत गेली. नेहरूंनी देशाच्या विकासाला दिशा दिली. सरदार पटेल यांनी देश अखंड केला. या देशातली लोकशाही नेमकी कशी चालली पाहिजे याचे दिग्दर्शन करणारी राज्यघटना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी फार दूर पल्ल्याचा विचार करून तयार केली.

त्या काळामध्ये देशाच्या उभारणीची सूत्रे काय असावीत याचे पुढची शंभर वर्षे मार्गदर्शन होईल असा सामाजिक आणि सामरिक प्रगतीचा नकाशा काढणारे स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखे नेतेही त्या काळात होते. महात्मा गांधी यांनी तर या देशाच्या जडणघडणीमध्ये किती मोठे योगदान दिलेले आहे याला काही सीमा नाही. परंतु नंतरच्या काळात राष्ट्रीय नेतृत्वाचे अधःपतन होत गेले. लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी आणि अलीकडच्या काळातील अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारख्या नेत्यांनी देशाच्या भवितव्याला आकार देऊ शकणारे नेते म्हणून आपल्या परीने काम केले. त्यांचे काम नेहरू-गांधींच्या तुलनेने मोठे नसेलही, परंतु विचारसरणी आणि पक्ष यांच्या पल्याड जाऊन विचार केला तर या नेत्यांमध्ये देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता होती हे कोणीही मान्यच करील. देशातले लोक त्यांना नेता मानत होते.

परंतु आता अशा राष्ट्रीय नेतृत्वाच्या बाबतीत एवढी मोठी पोकळी निर्माण झालेली आहे की, ज्याला राष्ट्रीय नेता म्हणावे असा एकही पुढारी डोळ्यासमोर येत नाही. देशाचा खरा रखवालदार उपलब्ध होत नाही. म्हणून त्याला पर्यायी म्हणून कोणी बुजगावणे उभे केले आणि यालाच राष्ट्रीय नेता म्हणा अशी अपेक्षा व्यक्त केली म्हणून कोणी राष्ट्रीय नेता होत नाही. राष्ट्रीय नेतृत्वाचे निकष निःस्वार्थपणामध्ये आणि देशाला दिशा देण्याच्या वैचारिक क्षमतेमध्ये दडलेले असते. तशी वैचारिक क्षमता असणारा नेता देशासमोर नाही, ही वस्तुस्थिती कोणाला मान्यच केली पाहिजे.

आपल्या देशामध्ये नैसर्गिक साधने विपुल आहेत, औद्योगीकरणाला अनुकूल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे परदेशातल्या कंपन्या भारतात येऊन उद्योग उभे करत आहेत आणि आर्थिकदृष्ट्या आपण सुस्थितीत येत आहोत. म्हणून आपल्या देशाच्या नावाचा  आगामी काळातील महाशक्ती म्हणून उल्लेख होत आहे. अशा या काळात तरी राष्ट्रीय नेतृत्वाची चणचण जास्त तीव्रतेने जाणवत आहे. या बदलत्या परिस्थितीतून देशासमोर काही आव्हाने उभी राहिली आहेत. आर्थिक संपन्नतेतून अपरिहार्यपणे उभे राहणारे शोषण, सामाजिक आणि आर्थिक विषमता, भ्रष्टाचार आणि सर्वगामी नीतीभ्रष्टता त्याच बरोबर संपन्नतेतून निर्माण होणारा भोगवाद अशी ही नवी आव्हाने आहेत. त्यातून मार्ग काढणारा नेता आपल्या देशाला लाभावा, अशी सदिच्छा आपण दिवाळीच्या निमित्ताने व्यक्त करू या.

Leave a Comment