सिटी बँक १५.५ दशलक्ष डॉलर्स विक्रम पंडितांना देणार

न्यूयॉर्क दि. ११ – मागच्या महिन्यातच सिटी ग्रूपच्या सीईओ पदाचा राजीनामा दिलेले विक्रम पंडित यांना सिटी ग्रूप १५.५ दशलक्ष डॉलर्स देणार असल्याचे शुक्रवारी बोर्ड सदस्य अध्यक्ष मायकेल ओनील यांनी जाहीर केले. विक्रम पंडित यांच्याच बरोबर राजीनामा दिलेले चीफ ऑपरेटिग ऑफिसर जॉन हेवन्स यांनाही सिटी ग्रुप १४ दशलक्ष डॉलर्स देणार असल्याचे समजते. सिटी ग्रुप देत असलेली ही रक्कम म्हणजे या दोघांनी बँकेसाठी घेतलेल्या कामाची पावतीच असल्याचे ओनील यांचे म्हणणे आहे.

विशेष म्हणजे याच ओनील यांनी पंडित यांना त्यांचे काम समाधानकारक नसल्याचे वैयक्तीकरित्या सांगितले होते आणि त्यानंतर पंडित यांनी त्वरीत राजीनामा दिला होता. वास्तविक ही बँक आर्थिक अडचणीत आली असताना सीइओ पदावर आलेल्या पंडित यांनी केवळ १ डॉलर मानधन घेऊन बँकेला दिवाळखोरीतून बाहेर काढून ती फायद्यात आणली होती. मात्र शेअर होल्डर भांडवल परत प्रस्ताव नाकारला गेल्यामुळे पंडित यांच्यावर बोर्डाने टीका केली होती.

पंडित यांनी सुरवातीला केवळ १ डॉलर मानधन घेऊन बँक फायद्यात आणल्यावर त्यांना २०११ सालासाठी १४.८ दशलक्ष डॉलर्सचे पॅकेज बँकेने दिले होते त्यावर गुंतवणूकदारांच्या भुवया उंचावल्या होत्या असेही समजते.

Leave a Comment