स्पाय प्रिन्सेसच्या पुतळ्याचे राजकन्येच्या हस्ते अनावरण

लंडन दि. ९- स्पाय प्रिन्सेस म्हणजेच गुप्तहेर राजकन्या म्हणून जगाला ओळख असलेल्या नूर इनायत खान हिच्या अर्धपुतळ्याचे अनावरण राजकन्या अॅन हिच्य हस्ते गुरूवारी करण्यात आले. मध्य लंडनमधील गॉर्डन स्क्वेअर गार्डन येथे उभारण्यात आलेला हा पुतळा आशियाई महिलेचे ब्रिटनमधील पहिले मेमोरियल ठरणार आहे.

स्पाय प्रिन्सेस नूर इनायत खान हिने दुसर्याध जागतिक युद्धात जर्मनांनी ताब्यात घेतलेल्या फ्रान्समध्ये ब्रिटन लष्कराची पहिली महिला वायरलेस ऑपरेटर म्हणून अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावली होती. नाझींच्या गुहेत शिरून तिने अनेक महत्त्वाच्या बातम्या ब्रिटनला पाठविल्या होत्या. अखेर ती पकडली गेली आणि तिला डाचौच्या छळछावणीत १० महिन्यांच्या अनन्वित छळानंतर गोळ्या घालून ठार करण्यात आले. त्यावेळी ती अवघी ३० वर्षांची होती.

भारतात १८ व्या शतकातील मैसूरचा राजा टिपू सुलतान याची वंशज असलेल्या नूरचा जन्म रशियात झाला होता. वडील भारतीय तर आई अमेरिकन अशा कुटुंबातील नूरचे बालपण लंडनमध्ये गेले. नंतर हे कुटुंब पॅरिसला स्थायिक झाले मात्र दुसर्या् जागतिक युद्धात जर्मनीने फ्रान्स ताब्यात घेतल्यानंतर नूर बोटीतून निसटून इंग्लंडला आली. ४० साली ती ब्रिटीश लष्करात वायरलेस ऑपरेटर म्हणून रूजू झाली आणि ४२ साली तिची रवानगी कामगिरीसाठी फ्रान्सला करण्यात आली. ४३ सालच्या जून महिन्यात तिने ब्रिटीश वायरलेस ऑपरेटरचे नेटवर्क एकहाती चालवून नाझींना हुलकावणी देत आणखी तीन महिने महत्त्वाच्या बातम्या ब्रिटनला पुरविल्या. अखेर तिचे सारे साथीदार आणि ती गेस्टापोच्या हाती पकडले गेले.

नूर गेस्टापोच्या हाती तिच्याशी झालेल्या विश्वासघातमुळे सापडली. तिची रवानगी छळछावणीत करण्यात आली आणि सतत दहा महिने मारहाण, उपासमार आणि असह्य छळाला तिने तोंड दिले. नंतर तिला गोळी घालून ठार करण्यात आले होते.

Leave a Comment