ओबामांची दुसरी टर्म

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या आधीच्या अध्यक्षांनी अमेरिकेच्या आर्थिक स्वार्थासाठी जी   परराष्ट्र नीती अवलंबिली होती. तीच ओबामा यांनी पुढे चालवली. या नीतीतच ओसामा बिन लादेन निर्माण झाला.  त्याला अमेरिकेचा क्रमांक एकचा शत्रू जाहीर करून ओबामा यांनी त्याला ठार केले आणि अमेरिकी नागरिकांची शाबासकी मिळवून दुसर्यांादा अध्यक्षस्थान मिळवले. जागतिक स्तरावरचा दहशतवाद अमेरिकेच्या धोरणांतून निर्माण झाला. कोणत्याही समृद्ध देशातून तो निर्माण होत असतो. चीनच्या परराष्ट्र नीतीतूनही तो तसा निर्माण होऊ शकतो आणि भारत हा महाशक्ती झाला तरीही ते अपरिहार्य ठरेल. ओबामा यांनी या दहशतवादाचा आपल्या स्वार्थासाठी चांगलाच उपयोग करून घेतला आणि निवडणूक जिकली.

खरे तर त्यांची निवडून येण्याची शक्यता नव्हती कारण त्यांच्या कार्यकाळात अमेरिकेची आर्थिक ताकद कमी झाली आहे. देशाच्या सरकारी अर्थव्यवस्थेत १ महापद्म डॉलर्सची तूट आह ती कशी भरून काढायची ही गहन समस्या आहे. लोकांच्या मनात सरकारी रोख्यांच्या विषयीची विश्वासार्हता राहिलेली नाही. बेकारीचा दर वाढलेला आहे.  ओबामा यांच्याच डेमॉक्रेटिक पार्टीचे नेते माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांनीच स्वतः अर्थव्यवस्थेविषयी चिंता व्यक्त केली आहे. अशा स्थितीत पराभवाचे रूपांतर करण्यासाठी ओसामा उपयोगी पडला. भारत काय की अमेरिका काय राजकारण सर्वत्र सारखेच असत.  या निवडणुकीच्या प्रचारात ओबामा यांचे प्रतिस्पर्धी मिट रोमनी यांनी वर्णवाद आणला. व्हाईट हाऊसमध्ये ‘व्हाईट’ माणसाला पाठवा असा प्रचार त्यांनी केला. परंतु अमेरिकेच्या मतदारांनी या संकीर्ण वर्णवादाला प्रतिसाद दिला नाही. ओबामा पुन्हा निवडून आले. दुसर्यार महायुध्दानंतर सलग दोनवेळा संधी मिळालेले बराक ओबामा हे डेमोक्रेटीक पक्षाचे दुसरे अध्यक्ष आहेत.

जगभरातल्या पददलित आणि उपेक्षित समाजातील तरुणांना ओबामा हा आपला आदर्श वाटतो. कारण ओबामा कृष्णवर्णीय आहेत आणि वंचित समाज घटकातून पुढे येऊनही दुसर्यांणदा अमेरिकेचे अध्यक्ष झाले आहेत. आपणही कधीतरी गुलामीच्या बेड्या तोडून विकासाच्या मार्गावर चालू शकू असा विश्वास त्यांना ओबामा यांच्याकडे बघून वाटतो. ओबामा यांचे अध्यक्ष होणे पूर्ण जगाच्या भवितव्यावर प्रभाव टाकणारे आहे. कारण जगाच्या राजकारणात अजून तरी अमेरिकेचा शब्द प्रमाण मानला जात असतो. २००८ साली ओबामा अध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी बर्या च वेळा महात्मा गांधींच्या नावाचा जप केला होता. त्यावरून ते जगाच्या राजकारणामध्ये काहीतरी पर्यायी कार्यक्रम राबवतील अशी आशा बर्यातच लोकांना वाटली होती. तसा कसलाही कार्यक्रम न राबवताही त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला. पण शेवटी ओबामा हे ‘अमेरिकेच्या’ अध्यक्षासारखेच वागले. जगाचे राजकारण त्यांनीही  मानवतेच्या नाही तर अमेरिकेच्या हितासाठी राबवले. 

उत्तर कोरिया आणि इराण या देशांनी अण्वस्त्रे बनवू नयेत म्हणून त्यांच्यावर दबाव आणण्याचे राजकारणही ओबामा यांनी आपल्या पूर्वसुरींच्या प्रमाणेच जारी ठेवले.  अमेरिका चीनच्या वर्चस्वाला शह देण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते. त्यासाठी भारताचा उपयोग करून घेण्याचीही धडपड चाललेली असते. मात्र भारत आणि पाकिस्तान यांच्या संघर्षात भारताला दाबणे आणि चीनला शह देण्यासाठी भारताला प्रोत्साहन देणे अशी भारताविषयीची दुहेरी नीती ओबामा यांनीही तशीच जारी ठेवली होती आणि यापुढेही तशीच राहणार आहे.  अमेरिकेचे भारताबाबतचे धोरण आता काय असेल यावर सगळ्यांचे लक्ष खिळलेले आहे. भारताच्या महाशक्ती होण्यामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा मोठा वाटा आहे आणि या उद्योगात आऊटसोर्सिंगचा व्यवसाय प्रामुख्याने केला जातो. भारताची श्रीमंती आऊटसोर्सिंगमधून निर्माण झालेली आहे. अमेरिकेच्या एकूण अर्थ व्यवहारात भारताचे महत्त्व  एक टक्कासुध्दा नाही. परंतु केवळ आऊटसोर्सिंगचा विचार केला तर मात्र भारताची या व्यवसायातली उलाढाल अमेरिकेने दखल घ्यावी अशी आहे.

भारतातल्या आऊटसोर्सिंगच्या व्यवसायापैकी ८० टक्के व्यवसाय अमेरिका आणि युरोपशी होत असतो. त्यामुळे या बाबतीत अमेरिका काय धोरण आखते यावर भारताच्या आऊटसोर्सिंगच्या व्यवसायाचे धोरण अवलंबून असते. ओबामा यांनी  कितीतरी वेळा या आऊटसोर्सिंगबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे. अर्थात,  तरीही हा धंदा भारताला मिळणारच आहे. कारण ती एक वस्तुस्थिती आहे. अमेरिकेत  बेकारी असताना  देशातली कामे देशातल्याच तरुणांना देण्याच्या ऐवजी ती भारताकडे आऊटसोर्स करण्याची गरजच काय असे ओबामा यांचे म्हणणे आहे. परंतु भारताकडे आऊटसोर्स केलेली कामे अमेरिकेच्या मानाने कितीतरी स्वस्तात होत असतात. एकंदरित  ओबामा यांच्या आगामी चार वर्षांच्य कारकिर्दीत भारत आणि अमेरिका यांच्यात आऊटसोर्सिंगवरून ओढाताण होणार. तिथल्या आरोग्य विमा योजनेमुळे मात्र भारताच्या याच क्षेत्राला प्रचंड कामेही मिळणार आहेत. तेव्हा ओबामा भारतासाठी संमिश्र ठरणार आहेत.

Leave a Comment