केदारनाथ – अर्धे ज्योतिर्लिंग

हिमालयातील चारधाम यात्रेत गणना होत असलेले महत्त्वाचे तीर्थक्षेत्र म्हणजे केदारनाथ. भारतात प्रसिद्ध असलेल्या शंकराच्या १२ ज्योतिर्लिंगातील हे एक असले तरी ते पूर्ण लिंग नाही तर अर्धलिंग आहे. हृषिकेशपासून २०९ किमीवर असलेले हे स्थान तब्बल ३५३८ मीटर उंचीवर असून पायथ्यापासून चौदा किमीची चढण त्यासाठी चढून जावी लागते. हा प्रवास पायी जसा करतात तसेच दंडी, कंडी, डोली, घोडे यावरूनही केला जातो. हृषिकेशपासून थोडे दूर गेले की सतत वळणावळणाच्या घाटातून हा प्रवास सुरू होतो. एका बाजूला खोल दर्‍या तर दुसरीकडे उंचचउंच डोंगरशिखरे यातून जाणारी ही वाट अनेकवेळा काळजाचा ठोका चुकविते. मात्र चित्रविचित्र अनोळखी आणि मंद वासाची फुले, धबधबे, खळाळून वाहणारे ओहोळ प्रवास नयनरम्य करतात.
kedarnath1
हृषिकेश पासून देवप्रयाग, श्रीनगर, रूद्रप्रयाग, तिलवाडा, अगस्तमुनी, गुप्तकाशी, मुंडकटा गणेश, सोनप्रयाग, गौरीकुंड आणि केदार असा हा प्रवास. सोनप्रयाग ते गौरीकुंड हा पाच किमीचा प्रवास अरूंद पण सुरेख रस्त्याने आणि मंदाकिनीच्या काठाने होतो. गौरीकुंड येथे गौरी म्हणजे पार्वतीने तप केले होते. येथे शंकर पार्वतीची धातूची मूर्ती असून गरम पाण्याचे कुंड आहे. गौरीकुंडलाच जादाचे सामान ठेवण्यासाठी व्यवस्था होते. येथे आवश्यक तेवढे सामान म्हणजे गरम कपडे, अत्यावश्यक औषधे, बॅटरी यासारख्या वस्तू एका छोट्या बॅगेत भरून घ्यायच्या आणि केदारची चढण चढायला सुरवात करायची. संपूर्ण वाटेत हिरवाइने नटलेले डोंगर,धबधबे पाहायला मिळतात. साधारण सहा किमीवर रामबाडा म्हणून ठिकाण असून येथे गरमागरम चहा फराळाची व्यवस्था होऊ शकते. थंडी प्रचंड आणि कोणत्याही क्षणी झडझडून कोसळणारा पाऊस आणि खळाळून वाहणारा मंदाकिनीचा प्रवाह  नित्य सोबत करतात. रामबाडा सोडून आणखी साधारण चार किमी गेले की गरूड चट्टी लागते. येथून पुढचा प्रवास बर्‍यापैकी सपाटीवरून होतो. लाकडी पूल ओलांडून गेले की गांव लागते आणि गावाच्या दुसर्‍या टोकाला आहे केदारेश्वराचे अतिप्राचीन , भव्य मंदिर.
kedarnath2
चौथरा चढून वर गेले की फरसबंदी प्राकार आहे. प्रवेशाच्या जागीच प्रंचड मोठी घंटा टांगलेली असून थोडे पुढे गेले की आहे भलामोठा नंदी. दुपाखी उतरते छप्पर असलेले हे मंदिर पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते. गाभार्‍यावर ब्रह्मी पद्धतीचे शिखर आहे. येथे गाभार्‍यात शिवपिंडी नाही तर आहे प्रचंड पाषाण शिला. कमरेइतक्या उंचीची. गाभार्‍यात अंधार आहे पण तेलतुपाचे दिवे सतत तेवत असतात. सभामंडपात पांडव, कुंती, द्रौपदी यांच्या मूर्ती आहेत. येथे शिवाला अभिषेक म्हणून तूप थापले जाते. प्रंचड थंडी असल्याने येथे भाविकांना स्नान न करता देवदर्शनाची मुभा आहे.
kedarnath
या स्थानाची कथा अशी सांगितली जाते की महाभारत युद्धात पांडवांकडून अनेक ब्राह्मण हत्या झाल्या. त्याचे पातक त्यांना लागले. स्वर्गप्राप्तीतील हा महत्त्वाचा अडथळा ठरला. मग शंकराची उपासना करून त्यांच्याकडून उःशाप मिळविण्याचा सल्ला पांडवांना मिळाला. शंकराला या गोष्टीचा पत्ता लागताच तो गुप्तच झाला. तेव्हा कृष्णाने सांगितले की केदार पर्वतावर तो पशूच्या रूपात तुम्हाला दिसेल. त्याला ओळखण्याची खूण म्हणजे तेथील सर्व रेडे भीमाच्या पायांच्या मधून घालवा. शंकर असेल तो भीमाच्या पायांमधून जाणार नाही.पांडवानी त्याप्रमाणे केले. शंकररूपी रेडा भीमाच्या पायांमधून जाऊ लागताच पांडवांनी त्याला ओळखले आणि भीमाने त्याची शेपटी धरून त्याला खेचले पण तोपर्यंत शंकररूपी रेड्याचा निम्मा भाग नेपाळात जाऊन पोहोचला होता. नेपाळचा पशुपती तो हाच. केदारनाथ येथे रेड्याच्या शेपटीकडचा भाग आहे आणि त्यामुळेच हे शिवलिंग अधलिंग असून उरलेले अर्धलिंग पशुपतीनाथ हे आहे. बारा ज्योतिर्लिंगांची यात्रा करताना या दोन्ही ठिकाणचे दर्शन घ्यावे लागते.
kedarnath3
केदारचे मंदिर खुले होते अक्षयतृतीयेच्या दिवशी व बंद होते भाऊबीजेला. कारण नंतर येथे पूर्ण बर्फच असते. मंदिराचे स्थान १२ हजार फुटांपेक्षा उंचीवर असल्याने हाय अल्टीट्यूडचा त्रास बरेचवेळा होतो. चक्कर येणे, भूक जाणे, पोट बिघडणे हे प्रकार प्राणवायूच्या कमतरतेने होतात. त्यामुळे योग्य ती काळजी घेणे आवश्यक असते मात्र तरीही केदारची भेट चुकवू नये अशीच.एक मुक्काम करणे केव्हाही चांगले. मुक्कामाच्या व जेवणाखाणाच्या चांगल्या सोयी आहेतच पण त्यातही मंदिराबाहेरच्या टपर्‍यात मिळणारी आलू टिक्की आणि गुलाबजाम चाखायलाच हवेत. केदारच्या वाटेवर असलेली गुप्त काशी म्हणजे काशी विश्वेश्वराचे दुसरे स्थान. मंदाकिनीच्या दोन तीरांवर असलेली उखीमठ आणि गुप्तकाशी येथून दिसणारी चौखंबा हिमशिखरे नेत्रसुखद. पहाटे त्यावर सूर्याची किरणे पडली की अक्षरशः सोन्यासारखी चमकतात. गुप्तकाशीलाही विश्वेश्वर मंदिर आणि मनकर्णिका कुंड असून या कुंडात गंगा आणि यमुना नदीचे पाणी येते. येथेच अर्जुननाने भिल्लरूपी शंकराची युद्ध करून पाशुपतास्त्राची प्राप्ती करून घेतली. येथे गुप्तदानाचे महत्त्व मोठे आहे. अर्धनारीनटेश्वराचे मंदिरही पाहण्याजोगे.
kedarnath4
गौरीकुंडापासून साधारण दीड किमीवर आहे मुंडकटा गणेश. पार्वती स्थानाला गेली आणि तिने दरवाज्यावर राखणदार म्हणून मळापासून बनविलेल्या गणेशला बसविले. शंकर आले तरी हा गणेश त्यांना आत सोडीना तेव्हा शंकरांनी त्यांचे मुंडके उडविले. पार्वतीने शोक केला तेव्हा हत्तीचे मुंडके आणून गणेशाला जोडले अशी कथा. येथील गणेशमंदिरातील मूर्तीला शीर नाही. येथूनच तीन किमीवर आहे त्रिजुगी नारायण. पांढर्‍या मंद वासांच्या गुलाबांनी भरलेल्या या वाटेवर असलेल्या मंदिरात विष्णू, भूदेवी आणि श्रीदेवीच्या मूर्ती आहेत आणि आवारात आहे सतत पेटलेला होम. शिवपार्वतीच्या विवाहाच्या वेळी हा होम पेटवला गेला असे सांगतात. हृषिकेशपासून निघाल्यानंतर तिलवाडा येथे एक मुक्काम करून भल्या पहाटे केदारनाथाला निघायचे हा चांगला पर्याय आहे. केदारनाथाची चढण चढायला पायी साधारण आठ ते दहा तास लागतात तर घोडा, दंडी अथवा डोलीने गेल्यास हा प्रवास पाच ते सहा तासात करता येतो. वर दिवे नाहीत मात्र सौरदिव्यांनी पुरेसा उजेड मिळतो. विशेष म्हणजे बीएसएनएलचे फोन आहेत. मोबाईललाही रेंज येते. कठीण आणि खडतर असला तरी हा प्रवास शक्य असेल तेव्हा जरूर करावा.

Leave a Comment