हैदराबाद: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महम्मद अझरुद्दिन याच्यावर मॅच फिक्सिंग प्रकरणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने घातलेली आजीवन क्रिकेट बंदी अवैध असल्याचा निर्वाळा आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने दिला.
अझरुद्दीनवरील बंदी उच्च न्यायालयाने उठविली
मॅच फिक्सिंग प्रकरणी दोषी ठरवून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अझरुद्दिनवर ५ डिसेंबर २००० रोजी आजीवन क्रिकेट बंदी लादली होती. नियामक मंडळाच्या या आदेशावर अझरुद्दिनने हैदराबाद सत्र न्यायालयात दाद मागितली होती. मात्र न्यायालयाने नियामक मंडळाची बाजू उचलून धरली. या निर्णयाविरोधात अझरुद्दिन याने उच्च न्यायालयात दाद मागितली.
आपल्यावर घातलेली बंदी कोणत्याही पुराव्याची शहानिशा न करता घालण्यात आल्याचा अझरुद्दिनच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून उच्च न्यायालयाने ही बंदी उठविली.
भारताच्या या यशस्वी कर्णधाराने १५ वर्षाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत ९९ कसोटी सामने खेळून ६ हजार २१५ धावा केल्या आहेत. त्याने ३३४ एकदिवसीय सामन्यात ९ हजार ३७८ धावा जमविल्या आहेत.