हा तर स्वामीजींचा गौरव

मराठीत एक फार चांगली म्हण आहे. ‘पादर्यााला पावट्याचे निमित्त’ या म्हणण्याचा चांगलाच प्रत्यय नितीन गडकरी यांच्या बाबतीत निर्माण झालेल्या वादाच्या निमित्ताने येत आहे. गडकरी यांनी भोपाळ येथे केलेल्या एका भाषणात स्वामी विवेकानंद आणि दाऊद इब्राहिम यांची तुलना केली असा प्रवाद निर्माण झाला आहे. गडकरी यांनी या दोघांना एका पारड्यात बसवले आणि विवेकानंदांचा अपमान झाला असा आरडा ओरडा काही हितसंबधी मंडळींनी सुरू केला आहे.

काँग्रेसच्या नेत्यांनी तर या संबंधात आपली विवेकानंदांविषयीचे कथित प्रेम व्यक्त करण्याची खाज बुजवून घ्यायला सुरूवात केली आहे. त्यांना आज विवेकानंदांचा वापर करून गडकरी यांना बदनाम करण्याची हौस पुरवून घेण्याची संधी मिळाली आहे. त्यांचे हे विवेकानंद प्रेम बघून विवेकानंद केन्द्राचे पदाधिकारीही बुचकळ्यात पडले असतील. काँग्रेसचे हे विवेकानंद प्रेम या राजकीय संधीसाठी निर्माण झाले आहे. काँग्रेसच्या नेत्यांचे हे विवेकानंद प्रेम खरे असेल तर त्यांनी सरकारच्या एखाद्या  तरी योजनेला नेहरू गांधी घराण्याच्या वंशजांच्या ऐवजी विवेकानंदांचे नाव देऊन दाखवावे. काँग्रेसच्या नेत्यांना असा कोणाचा उमाळा कोणत्या वेळी येईल याचा काही नेम सांगता येत नाही.

या लोकांनी आता गडकरी यांच्या विरोधात न्यायालयात खटलाही दाखल केला आहे. विवेकानंदांची तुलना करून गडकरी यांनी हिंदू धर्माची बदनामी केली असल्याची तक्रार त्यांनी केली आहे. ही एक गोष्ट बरी झाली. या प्रकरणात खरेच न्यायालयात खटला उभा रहावा अशी प्रार्थना स्वतः गडकरी देवाकडे करीत असतील कारण तसे झाले तर मीडिया ट्रयलमधून सुटका होऊन न्यायालयात त्यांनी नेमके काय म्हटले होते याची पुराव्या निशी छाननी तरी होईल. तसे झाल्यास कोणतेही न्यायालय हा खटला दाखल सुद्धा करून घेणार नाही. कारण गडकरी यांनी या उद्गारातून विवेकानंदांची बदनामी केली या म्हणण्यात तीळभरही तथ्य नाही हे न्यायालयाच्या लक्षात येईल. गडकरी यांनी आपल्या भाषणात विवेकानंद आणि दाऊद इब्राहिम हे दोघे सारखेच होते किंवा एका माळेचे मणी होते असे काही म्हटलेले नाही. त्यांच्यात काही साम्य होते असे म्हटले तर नाहीच पण साधे सूचितही केले नाही.  त्यांच्या म्हणण्यात तसे काही असते तर वृत्त वाहिन्यांनी त्यांचे ते उद्गार पुन्हा पुन्हा वाजवले असते आणि ती वाक्ये तशीच हजारवेळा लोकांना ऐकवली असती.

तशी ती ऐकवली जात नाहीत कारण त्यात विवेकानंदांची बदनामी होईल असे काहीही नाही. उलट या वाक्यात विवेकानंदांचा गौरव केला आहे. देवाने प्रत्येकाला बुद्धी दिली आहे. ‘तिचा वापर कोणी चांगल्या कामासाठी करतो तर कोणी वाईट कामासाठी करतो’ असे गडकरी यांनी म्हटले होते. आम्ही, ‘गडकरी यांना असे म्हणायचे होते’, असे म्हणून त्यांच्या वाक्याचा गर्भितार्थ वगैरे सांगून त्यांचे समर्थन करण्याचा प्रयत्न करीत नाही. त्यांनी जे काही म्हटले आहे ते तसेच त्यांच्या शब्दात सांगत आहोत. आता या म्हणण्यात चूक काय आहे ?

कोणाही सामान्य माणसाने पोलिसांकडे चौकशी करावी. ते सांगतील की काही वेळा चोर इतक्या शिताफीने चोरी करतो की, पोलीसही चक्रावून जातात. त्यात त्याची बुद्धीच प्रकट झालेली असते. त्याला बुद्धी असते, एवढेच नाही तर ती बुद्धी कोणाही पेक्षा तल्लख असते. पण ती वाईट कामासाठी वापरलेली  असते. हीच बुद्धी चांगल्या कामासाठी वापरली असती तर त्यांच्यातून विवेकानंदांसारखा मोठा माणूस निर्माण झाला असता. बुद्धीचा चांगला आविष्कार म्हणजे विवेकानंद आणि वाईट आविष्कार म्हणजे दाऊद इब्राहिम. आता या म्हणण्याने  विवेकानंदांचा गौरव झाला की बदनामी झाली ? डोके ठिकाणावर असणारा कोणीही सामान्य माणूस सांगेल की  यात स्वामीजींचा गौरव झाला आहे. पण ज्याला गडकरींची बदनामी करण्याचे निमित्तच हवे असेल तो ही गोष्ट समजून घेणार नाही.

आज स्वामीजी हयात असते तर आणि त्यांनी हा वाद ऐकला असता तर त्यांनी काय केले असते ? त्यांनी  दिग्विजयसिंग, राम जेठमलानी यांच्या कानफाटात लगावून दिली असती आणि गडकरी यांच्या पुढे जाऊन या मूर्खांना मानवी बुद्धीचे शास्त्र समजावून सांगितले असते.

गडकरी म्हणतात एखादा माणूस दाऊद प्रवृत्तीचा असतो आणि एखादा माणूस विवेकानंद प्रवृत्तीचा असतो. म्हणजे एक असतो तामसी प्रवृत्तीचा आणि दुसरा असतो सात्त्विक प्रवृत्तीचा. पण विवेकानंद म्हणत असत की सात्त्विक आणि तामसी या दोन्ही प्रवृत्ती एकाच माणसात असतात. माणसावर चांगले संस्कार करून त्याच्यातली सात्त्विक प्रवृत्ती वाढवता येते आणि वाईट संस्कार करून तामसी प्रवृत्तीही वाढवता येते.  आज गडकरी यांच्या एका वाक्याचा विपर्यास करून त्यांना बदनाम करण्यास टपलेले लोक ही तामसी प्रवृत्तीचे आहेत. कारण त्यांनी शब्दांची फेराफेरी करून आपला स्वार्थ साधण्याचा अश्लाघ्य प्रयत्न चालवला आहे. आपल्या या स्वार्थासाठी विवेकानंदांचा वापर करायला सुरूवात केली आहे हीच विवेकानंदांची खरी बदनामी आहे.

Leave a Comment