कसाबचा डेंग्यू – येरवडा कारागृहात दक्षता

पुणे दि. ७ – मुंबईच्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेला व सध्या जिवंत असलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाब याला डेंग्यू झाल्याची वार्ता येताच पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात तेथील कैद्यांना डेंग्यूची लागण होऊ नये म्हणून उपाययोजना सुरू करण्यात आली असल्याचे येरवडा कारागृहाचे सुपरिटेंडेंट योगेश देसाई यांनी सांगितले. कारागृहातील सर्व कैद्यांची नियमित तपासणी करण्यात येत आहेच पण तुरूंगात वेळोवेळी फ्युमिगेशन करण्यात येत आहे तसेच कुठेही पाणी साठून राहणार नाही याचीही दक्षता घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्य कारागृह विभागाच्या वरीष्ठ अधिकार्यांंनी मात्र केवळ येरवड्यातच नाही तर राज्यातील सर्व कारागृहातून फ्युमिगेशन केले जात असल्याचे सांगितले आहे. तसेच डासाची उत्पत्ती होऊ नये यासाठीही सर्वतोपरी काळजी घेतली जात असल्याचे म्हटले आहे. दरम्यान कसाबची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याने त्याला जेजे रूग्णालयात हलविण्यात येणार नाही असाही खुलासा त्यांनी केला आहे.

येरवडा कारागृहातील कांही कैद्यांना ताप आला होता मात्र त्यांची त्वरीत तपासणी करून त्यांच्या रक्ताचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. मात्र हा ताप व्हायरल असल्याचा रिपोर्ट प्रयोगशाळेकडून मिळाल्याचेही देसाई यांनी यावेळी स्पष्ट केले.

Leave a Comment