लोकसभा उमेवारीसाठी पुण्यातील नेत्यांची मोर्चेबांधणी सुरू

पुणे दि. ६ – लोकसभेच्या निवडणुकांसाठी अद्यापी दीड वर्षाचा कालावधी बाकी असला तरी काँग्रेसने अगोदरपासूनच उमेदवार निश्चितीची प्रक्रिया सुरू केली आहे. पुण्यातून काँग्रेस उमेदवारांसंबंधीची यादी तयार करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने पाठविलेले निरीक्षक केवल सिंग पुण्यात पाहोचले असून ते आज म्हणजे मंगळवारी स्थानिक काँग्रेस नेते, कार्यकर्ते यांची मते बैठका घेऊन जाणून घेणार आहेत.

केवल सिंग पुण्यात येत असल्याने काँग्रेसमधून निलंबित केलेले व पुण्याचे खासदार सुरेश कलमाडी यांच्या गटातही उत्साहाचे वातावरण असून त्यांनी आपली मोर्चेबांधणी अगोदरपासूनच केली आहे. निरीक्षकांवर आपला प्रभाव पाडण्याचा चंगच कलमाडी गटाने बांधला आहे. राष्ट्रकुल घोटाळ्यामुळे निलंबनाची कारवाई केलेल्या कलमाडी यांचे निलंबन मागे घ्यावे आणि त्यांनाच पुन्हा पुण्याचे लोकसभा उमेदवार म्हणून निवडले जावे यासाठी कलमाडी गटाने स्थानिक कार्यकर्ते व नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन पाठिबा द्यावा यासाठी यापूर्वीच संपर्क साधले आहेत असेही समजते.

अर्थात सुरेश कलमाडी यांनी यापूर्वीच आपण लोकसभेची आगामी निवडणूक पुण्यातूनच लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. शहरातील कलमाडी विरोधी गटाने अद्यापी आपले पत्ते उघड केलेले नसले तरी शरद रणपिसे यांनी त्यांचे नाव निरीक्षकांना सुचवावे यासाठी कसून प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांनी त्यासाठी निवडक काँग्रेस नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या असल्याचेही वृत्त आहे. अन्य इच्छुकांत माजी प्रवक्ते अनंत गाडगीळ आणि शहराध्यक्ष मोहन जोशी यांची नांवे चर्चेत असून आजच्या बैठकीत कोणती नांवे शॉर्टलिस्ट होतात याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

Leave a Comment