उत्तर प्रदेशात सपाचा ब्राह्मणानुनय

बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांनी ब्राह्मण समाजाला आपलेसे करून आपले राजकीय उद्दिष्ट साध्य केले पण आता हा समाज मायावती यांच्या मागे उभे राहण्याच्या मनस्थितीत नाही. त्याचा फायदा घेऊन समाजवादी पार्टीचे नेते मुलायमसिंग यादव यांनी या समाजाला कुरवाळायला सुरूवात केली आहे. मायावती यांनी ब्राह्मणांना जवळ करण्यासाठी जशी ब्राह्मण संमेलने घेतली होती तशीच संमेलने घेण्याचा सपाटा आता समाजवादी पार्टीने लावला आहे. उत्तर प्रदेशातल्या जातीय राजकारणात या गोष्टीला आता फार महत्त्व आले आहे. कारण हा समाज मुलायमसिंग यांच्याकडे आकृष्ट झाला तर मायावती यांचे वजन कमी होणार असून मुलायमसिंग यांचे पारडे कायमचे जड होणार आहे. समाजवादी पार्टीची अशी संमेलने फर्रुकाबाद, महोबा, सुलतानपूर, प्रतापगढ, कानपूर आणि बाराबंकी या शहरात झाली आहेत कारण या भागात ब्राह्मणांची संख्या मोठी आहे.   

बसपाने ब्राह्मणांना जवळ केले असले तरी बसपाच्या मनातले हे ब्राह्मण प्रेम खरे नाही. बसपाच्या स्थापनेच्या काळात  बसपा नेत्यांनी किती तरी गलिच्छ भाषेत ब्राह्मणांच्या विरोधात प्रचार केला होता. समाजवादी पार्टी हा तसा ब्राह्मण प्रेमी पक्ष नाही पण या पक्षाने ब्राह्मणांच्या विरोधात कधीही शिवराळ भाषेत प्रचार केलेला नाही आणि ब्राह्मणांचा द्वेष केलेला नाही असे मुलायमसिंग यादव आणि त्यांच्या पक्षाचे नेते ब्राह्मण संमेलनात आवर्जुन सांगत आहेत. आता काही ब्राह्मण नेते बसपात आहेत पण त्यांना तिथे मान दिला जात नाही. काही ठराविक ब्राह्मण नेते वगळता बसपात ब्राह्मणांना काही स्थान नाही. त्यापेक्षा सामान्य ब्राह्मण समाजाने समाजवादी पार्टीच्या जवळ यावे असे आवासन सपातर्फे केले जात आहे आणि ते ब्राह्मणांच्या गळी उतरताना दिसत आहे. सपा मध्ये ब्राह्मण नेते फारसे नाहीत पण  जनेश्वर मिश्रा हे एकमेव नेते होते. त्यांचे निधन झाल्यापासून या पक्षात कोणी ब्राह्मण नेता उरलेला नाही. त्यांची जागा भरून काढू शकेल अशा नेत्याचा शोध समाजवादी पार्टी घेत आहे.

उत्तर प्रदेशात मतदारांचे जातीय ध्रुवीकरण झाले आहे. यादव आणि मुस्लिम समाज सपाच्या मागे उभा आहेच पण आता  आता ठाकूर समाजानेही आपले वजन सपाच्या पारड्यात टाकले आहे. त्यात ब्राह्मण मतांची भर पडली तर समाजवादी पार्टीचा पराभव करणे कोणालाच शक्य होणार नाही असे दिसत आहे म्हणूनच समाजवादी नेते ब्राह्मण नेत्यांचा अनुनय करायला लागले आहेत. त्याशिवाय उत्तर प्रदेशाच्या काही भागांत विशेषतः पूर्व भागात ब्राह्मण समाज हा ग्रामीण भागात तरी प्रभावी वर्ग मानला जात आहे. ब्राह्मणांना तिथे डिसीजन मेकर्स मानले जाते. या भागातले अनेक मतदार ब्राह्मणांना विचारून मतदान करतात म्हणूनच मुलायमसिंग यादव यांना ब्राह्मण समाज आवश्यक वाटायला लागला आहे. त्यामुळेच पक्षाच्या शीर्षस्थ नेत्यांत आता अशोक वाजपेयी, मनोज पांड्ये, राजेश दीक्षित अशा ब्राह्मण समाजातल्या तरुण नेत्यांची नावे आवर्जुन घेतली जात आहेत.  कधी नव्हे ते ब्राह्मण नेत्यांना महत्त्व आले आहे.

Leave a Comment