केजरीवालांचे नवे लक्ष्य अमरसिंग

इंडिया अगेन्स्ट करप्शन या अरविंद केजरीवाल यांच्या संस्थेने आता नवा बार उडवायची तयारी सुरू केली आहे. या वेळी त्यांनी समाजवादी पाटींचे माजी सरचिटणीस अमरसिंग यांना  समोर ठेवले आहे. अमरसिंग यांच्यावर मनी लाँडरिंगची केस आहे. त्यांनी जवळपास १०० बनावट कंपन्यांचे जाळे तयार केले असून त्यांच्यामार्फत जवळपास ५०० कोटी रुपये इतका काळा पैसा फिरवला आहे. या कंपन्यांचे प्रकरण बाहेर काढून केजरीवाल आता अमरसिंग यांची चौकशी करण्याची मागणी करणार आहेत. असे त्यांच्या निकटवर्तियांनी सांगितले. अमरसिंग यांच्या या प्रकरणाशी संबंधित फिर्याद कानपूरच्या पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. ती दाखल करणारे शिवकान्त त्रिपाठी यांना केजरीवाल यांचे काही कार्यकर्ते भेटून गेले असल्याने आता अमरसिंग यांना उघडे पाडण्याचा केजरीवाल यांचा बेत असल्याचे अंदाज वर्तविले जात आहेत.

त्रिपाठी यांनी कानपूर पोलिसांत २००९ साली ही फिर्याद दाखल केली होती आणि तिच्यात अमरसिंग यांनी १०० बनावट कंपन्या स्थापन केलेल्या असल्याचे म्हटले होते. या कंपन्या प्रत्यक्षात अस्तित्वात नाहीत पण त्यांच्या नावावर प्रचंड पैसा जमा दाखवला आहे. या कंपन्यांचे संचालक म्हणून अनेक लोकांची नावे टाकली आहेत. पण आता त्यातल्या सर्वांनीच हात वर केले असून आपला या कंपन्यांशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे. या कंपन्या स्थापन झाल्याचे तर या कागदोपत्री संचालकांना माहीत नाहीच पण या कंपन्या बरखास्त झाल्या असल्याचेही माहीत नाही. प्रत्यक्षात एक एक करून या शंभर कंपन्या बंद करून पंकजा आर्टस आणि मेसर्स सर्वोत्तम अशा दोनच कंपन्या शिल्लक ठेवल्या आहेत. या सगळ्या कंपन्यांचे पैसे या दोन कंपन्यात जमा केले आहेत. ते ५०० कोटी रुपये आहेत. एवढे पैसे त्या १०० कंपन्यांत कोठून आले याचाही काही पत्ता लागत नाही आणि ते नंतर याच दोन कंपन्यांत जमा का केले याचेही स्पष्टीकरण होत नाही.

गंमतीचा भाग म्हणजे या प्रकरणाची फिर्याद कानपूर पोलिसांत दाखल झाली होती ती आता मागे घेण्यात आली आहे. हा सारा एकमेकांना सांभाळून घेण्याचा प्रकार आहे. मुलायमसिंग यांच्यावर केंद्राने खटले भरलेले आहेत. ते मागे घेण्यात येणार आहेत कारण मुलायमसिंग हे सलमान खुर्शीद यांच्यावरचे खटले मागे घेणार आहेत.याच देवघेवीत मुलायमसिंग यांनी सरकारला  अमरसिंग यांच्यावरची कारवाई थांबवण्याची विनंती केली आहे.  

आर्थिक गुन्हे विभागाने या प्रकरणाची तपासणी केली आहे आणि अमरसिंग हे दोषी आढळले आहेत पण आता देवघेवीत या खात्याने कारवाई न करण्याचे ठरवले आहे. या खात्याने अमरसिंग यांची फाईल कानपूर पोलिसांकडे अधिक तपासासाठी पाठवली आहे आणि पोलिसांनी केवळ तीन दिवसांतच या प्रकरणात काही पुरावे नाहीत असे म्हणून फाईल बंद केली आह. तशी सूचना उत्तर प्रदेश सरकारने त्यांना केली आहे. पुरावे असतानाही फाईल बंद का केली असा सवाल आता केजरीवाल विचारतील.