महेश जेठमलानी भाजप कार्यकारिणीतून बाहेर

मुंबई: भ्रष्टाचाराचे आरोप असलेले राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्याबरोबर राष्ट्रीय कार्यकारिणीत काम करणे नैतिकदृष्ट्या पटत नसल्याचे कारण सांगून ज्येष्ठ विधिज्ञ आणि भारतीय जनता पक्षाचे नेते महेश जेठमलानी यांनी राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यपद सोडत असल्याचे अध्यक्षांना पत्र पाठवून कळविले आहे. महेश हे ख्यातनाम ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांचे पुत्र आहेत.

भाजप किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत माझे काहीच म्हणणे नाही. मात्र भ्रष्टाचाराचे आरोप असलेले गडकरी अध्यक्षपदी असेपर्यंत कार्यकारिणीत काम करू नये; असे माझे मत आहे; असे जेठमलानी यांनी पत्रात नमूद केले आहे. गडकरी यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपाला उत्तर देताना दिलेले स्पष्टीकरण समाधानकारक नाही; अशी टिप्पणीही जेठमलानी यांनी केली आहे.

महेश जेठमलानी यांचे पिता राम जेठमलानी हे देखील गडकरी यांचे पक्षांतर्गत टीकाकार आणि विरोधक आहेत. पंतप्रधान पदाच्या चर्चेत गडकरी यांचे नाव आघाडीवर असताना जेठमलानी यांनी; पक्षाने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करावे; अशी मागणी केली होती. इंडिया अगेन्स्ट करप्शनचे अरविंद केजरीवाल यांनी गडकरींवर केलेल्या आरोपात तथ्य असल्यास आपण केजरीवाल यांची बाजू लाऊन धरू; असेही राम जेठमलानी यांनी जाहीरपणे सांगितले होते.

Leave a Comment