पाकिस्तान बरोबरचे सामने उधळा – बाळासाहेब ठाकरे

मुंबई दि. ५ – झाले गेले विसरून जाऊ, पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळू या केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिदे यांच्या विधानाने संतप्त झालेल्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाकिस्तान संघाबरोबर होणारे सर्व सामने उधळून लावा असे भावपूर्ण आवाहन देशप्रेमी जनतेला केले. प्रकृती अस्वास्थामुळे मी जागचा उठू शकत नसलो तरी देशासाठी माझे रत्त* उसळून उठते आहे असे सांगतानाच त्यांनी गृहमंत्र्यांवर घणाघाती टीकाही केली.

बाळासाहेब ठाकरे यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात ते म्हणतात, सुशीलकुमार, थोडीही लाजलज्जा शिल्लक असेल तर क्रिकेट सामन्यांसंबंधी केलेले विधान ताबडतोब मागे घ्या. अन्यथा भारतात सामने होऊ देणार नाही. तुम्ही आम्हाला काय विसरायला सांगता आहात असा सवाल खडा करून ठाकरे म्हणाले की काय काय विसरायचे ते सांगा. संसदेवर झालेल्या हल्ला विसरायचा, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर झालेली निरपराध नागरिकांची हत्या विसरायची, मुंबई हल्ला विसरायचा का फाळणीनंतर देशाच्या सार्वभौमत्वावर सतत होत असलेले हल्ले विसरायचे?

संसदेवरील हल्ला परतवताना सहा जवान शहीद झाले, हा हल्ला परतवला नसता तर तिरंगा हिरवा होऊन फडकला असता याचे भान आपल्याला आहे काय?

अफजल गुरूला फाशी होऊन ११ वर्षे लोटली तरी त्याचा निर्णय लागत नाही. कसाबला फाशी झाली आहे , अबू जिंदालला फाशी झाली आहे कसाबचा दयेजा अर्ज आलाच आहे आता जिंदालचाही येईल. मग हे अर्ज फेटाळाणार आहात का पाकिस्तानबरोबरचे सामने बघत बसणार आहात असा सवाल करतानाच ठाकरे यांनी देशाला असले नेते मिळाले हे भारतमातेचे दुर्देव असल्याचेही ठणकावले आहे.

Leave a Comment