नरेंद्र मोदींचे बिहार मध्ये उत्स्फूर्त स्वागत

पटणा दि.५ – दोन वर्षाच्या कालावधीनंतर भाजप नेते कैलाशपती मिश्रा यांच्या निधनाबद्दल सांत्वन भेटीसाठी आलेले गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे अनपेक्षित जोरदार स्वागत बिहारमधील भाजप कार्यकर्त्यांनी केले असल्याचे वृत्त आहे. मिश्रा यांच्या कुटुंबियांना भेटून त्यांचे सांत्वन करण्यासाठी भाजपच्या अनेक नेत्यंसह नरेंद्र मोदी रविवारी पाटण्यात आले होते.

नरेंद्र मोदी जेव्हा मिश्रा यांच्या घराबाहेर आले तेव्हा तेथे जमलेल्या हजारो भाजप कायर्कर्त्यांनी उत्स्फूर्त घोषणा दिल्या. प्रधानमंत्री कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो अशा घोषणा हे कार्यकर्ते देत होते. आगामी सार्वत्रिक निवडणूकात मोदी पंतप्रधानपदाचे भक्कम दावेदार मानले जात असतानाच त्यांना विरोध करणार्यान नितीशकुमारांच्या बिहारमध्ये मोदींना मिळालेला पाठिबा अधिक महत्त्वाचा मानला जात आहे.

मोदी हे भाजपमधील एक लोकप्रिय नेते असल्याची प्रचीती या निमित्ताने आली असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. भाजपचे स्टार प्रचारक असूनही बिहारमध्ये २००५ व २०१० साली झालेल्या निवडणूकांत मोदींना प्रचारासाठी बोलावले गेले नव्हते. बिहारमध्ये जनता दल आणि भाजप यांचे सरकार नितिशकुमार चालवित आहेत मात्र नितिशकुमार यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या बहुतेक सर्व मुलाखतींत मोदी यांना पंतप्रधानपदासाठी आपला पाठिबा नाही हे स्पष्ट केले आहे.

मोदी यांच्याबरोबर पाटण्यास लालकृष्ण आडवानी, लोकसभा विरोधीपक्ष नेत्या सुषमा स्वराज, राज्यसभेचे विरेाधी पक्ष नेते अरूण जेटली व अनंत कुमार हेही मिश्रा यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी आले होते.

Leave a Comment