माध्यमांकडून केजरीवाल यांना अवास्तव महत्व: पारेख

नवी दिल्ली: प्रसार माध्यमांनी इंडिया अगेन्स्ट करप्शनचे अरविंद केजरीवाल यांना अवास्तव महत्व दिले असून ते काय म्हणाले; हे रोज सांगण्याऐवजी माध्यमांनी काही बातम्या लोकांपर्यंत पोहोचवाव्या; अशा शब्दात एचडीएफसीचे अध्यक्ष दीपक पारेख यांनी माध्यमांना फटकारले.

देशातील आघाडीचे उद्योजक आणि बँकर्स यांच्यासाठी आयोजित कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

या देशातून भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन अशक्य आहे. केजरीवाल आणि त्यांच्या समर्थकांनी रोज एकेकावर आरोप करण्याचा जो मार्ग अवलंबला आहे; त्या मार्गाने तर भ्रष्टाचार संपविणे कदापि शक्य नाही; असे पारेख यांनी स्पष्टपणे सांगितले.

केजरीवाल यांचा मार्ग आणि त्यांचे साध्य आपल्याला मान्य नसल्याने केजरीवाल यांनी आपला पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरवला तर त्यांच्या उमेदवारांना आपण कधीही मतदान करणार नाही किंवा त्यांना सल्ला द्यायला जाणार नाही; असेही पारेख यांनी स्पष्ट केले.

माध्यमांना लक्ष देण्यासारखे इतर विषय या देशात उरलेले नाहीत काय; असा सवाल करून पारेख यांनी माध्यमांना लक्ष्य केले. केजरीवालांचे महत्व माध्यमांनी विनाकारण वाढवून ठेवले आहे. ते काय म्हणतात हे वारंवार प्रसिद्ध करण्यापेक्षा खरोखरच्या ‘बातम्या’ जनतेपर्यंत पोहोचवा; असेही त्यांनी माध्यमांना सुनावले.