नवी दिल्ली: जनता पक्षाचे अध्यक्ष सुब्रमण्यम स्वामी यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि सरचिटणीस राहुल गांधी यांच्या कंपनीला कॉंग्रेस पक्षाने कर्ज दिल्याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे तक्रार दाखल केली आहे. कर्ज दिल्या प्रकरणी काँग्रेसची मान्यता रद्द करावी; अशी त्यांची मागणी आहे.
कॉंग्रेसने कर्ज देऊन प्रथमदर्शनी निवडणूक कायदा, आयकर कायदा यांचा भंग केला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने या प्रकरणी सुनावणी घ्यावी आणि कॉण्ग्रेस पक्षाची मान्यता रद्द करावी; असे स्वामी यांनी पत्रात नमूद केले आहे.
सर्वोच्च नेत्यांचा बचाव करण्याच्या प्रयत्नात काँग्रेस सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी उलट आपल्या नेत्यांना तोंडघशी पाडले आहे. पक्षामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकातही हे कर्ज बिनव्याजी दिले असून त्यापासून कोणताही व्यावसायिक नफा कमाविण्याचा उद्देश नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
स्वामी यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि सरचिटणीस राहुल यांनी बनावट कंपनी स्थापन करून बेकायदेशीर व्यवहारामार्फत दिल्लीत १६०० कोटी रुपयाची हेराल्ड हाउस ही मोक्याच्या जागेवरील मालमत्ता हडप केल्याचा आरोप केला आहे. सोनिया आणि राहुल गांधी यांनी यंग इंडिया नामक कंपनी स्थापन करून त्या कंपनीमार्फत असोसिएट्स जर्नल्स या नावाची कंपनी ताब्यात घेतली. त्याच्या बदल्यात काँग्रेस पक्षामार्फत कर्जस्वरूपात घेतलेला ९० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. या व्यवहारात अनेक कायद्यांचे उल्लंघन झाले असून त्याची केंद्रीय अन्वेषण विभाग अथवा सक्तवसुली संचालनालयाने चौकशी करावी; अशी मागणी स्वामी यांनी केली.
या आरोपाचा बचाव करताना द्विवेदी यांनी; ‘पक्षाने कर्जच तर दिले आहे; कोणताही वैयक्तिक फायदा तर नाही घेतला;’ असे विधान केले आहे. यावरून कॉंग्रेसने सोनिया आणि राहूल गांधी यांच्या ‘यंग इंडिया’ या कंपनीला कर्ज दिल्याचे स्पष्ट होत आहे.
द्विवेदी यांच्या या विधानावर स्वामी यांनी; कुठल्याही राजकीय पक्षाला कोणाला कर्जाऊ रक्कम देता येत नाही हे कायद्याच्या कलम क्रमांकासह पुन्हा ठासून सांगितले.
याच बरोबर वृत्तपत्र समूहाला नाममात्र दरात देण्यात आलेली मालमत्ता या संथेचे ताबेदार या नात्याने राहुल व सोनिया गांधी यांनी पुन्हा सरकारलाच भाडेपट्टीने दिली आहे. कंपनीकडून रजिस्टार कार्यालयाला सदर करण्यात आलेल्या भागधारकांच्या यादीत पं. जवाहरलाल नेहेरू, इंदिरा गांधी, जी.डी. बिर्ला अशा मृतांची नावेही समाविष्ट आहेत; असे अनेक आरोप स्वामी यांनी केले आहेत.