अमर सिंग आणि ‘बिग बी’ची पाठराखण लज्जास्पद: केजरीवाल

नवी दिल्ली: राज्यसभा सदस्य अमरसिंग, बिग बी अमिताभ बच्चन आणि त्यांच्या साथीदारांवरील फसवणूक आणि बेकायदेशीर सावकारीचे आरोप मागे घेण्याचा उत्तर प्रदेश सरकारचा निर्णय लज्जास्पद असून यापुढील काळात राजकारण्यांकडून कोणत्याही प्रकारच्या अपेक्षा बाळगणे व्यर्थ असल्याची टीका इंडिया अगेन्स्ट करप्शनचे अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.

अमर सिंह आणि त्यांची पत्नी पंकजा सिंह यांनी ५०० कोटी रुपयांचा काळा पैसा व्यवहारात आणण्यासाठी ५५ बोगस कंपन्या स्थापन केल्या. यापैकी बहुतेक कंपन्यांची नोंदणी कोलकाता येथे झाली. कालांतराने या सर्व कंपन्या पंकजा सिंह यांच्या पंकजा आर्टस या कंपनीत विलीन करण्यात आल्या. या सगळ्या व्यवहारात कंपनीला; अर्थातच सिंग दांपत्याला एका महिन्यात ५०० कोटी रुपयांचा नफा झाला; असे आरोप सिंग यांच्यावर आहेत.

या व्यवहाराबाबत शिवाकांत त्रिपाठी यांनी बाबूपुरवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीत पंकजा सिंह आणि बच्चन यांचीही नावे आहेत. तक्रार दाखल झाल्यापासून एक महिन्यातच संबंधित पोलीस ठाण्याने हा तपास आर्थिक गुन्हे विभागाकडे वर्ग करण्याची मागणी केली. मात्र तत्कालीन सरकारने हा तपास कोलकाता पोलिसांनी करावा; अशी विनंती केली. कोलकाता पोलिसांनी नकार देताच हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला. अचानक एका वर्षानंतर सरकारने हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून काढून घेऊन पुन्हा बाबूपुरवा विभागाच्या पोलीस उप अधीक्षकांकडे सोपविला. पोलिसांनी या प्रकरणी खटला उभा करण्यापुरते पुरावे मिळत नसल्याचा अहवाल सरकारला सादर केला.

या प्रकरणी आरोप मागे घेण्याच्या सरकारच्या निर्णयावर टीका करताना केजरीवाल यांनी ट्विटरवर; ‘हाच आपला कायदा आहे काय;’ असा सवाल केला आहे. आपल्याला भ्रष्ट राजकीय नेत्यांकडून कोणतीही अपेक्षा नाही. अशा नेत्यांना घराचा रस्ता दाखविण्यासाठी युवकांनी पुढे यावे; अशी अपेक्षा व्यक्त करतानाच केजरीवाल यांनी ज्यांच्याकडे कोणत्याही भ्रष्टाचाराची माहिती आहे; त्यांनी ती माहिती घेऊन इंडिया अगेन्स्ट करप्शनशी संपर्क साधावा; असे आवाहनही केले आहे.

Leave a Comment