ठिबक सिंचन वाढले पाहिजे

thibak

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अमरावती येथे झालेल्या कृषी पुरस्कारांच्या वितरणाच्या कार्यक्रमात बोलताना ठिबक सिंचन संच स्वस्त होणार असल्याचे जाहीर केले आहे. ठिबक सिंचन संचाचा शेतकर्यां ना पुरवठा करताना प्रचलित किमतीपेक्षा ३० ते ४० टक्के एवढी कमी किंमत असलेल्या कंपन्यांना प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी जाहीर केले आहे. सध्या एक हेक्टर जमिनीत ठिबक सिंचन संच बसवण्यास एक लाख  रुपये खर्च येतो. म्हणजे हा खर्च एका एकराला ४० हजार रुपये असा पडतो. त्यात ३० ते ४० टक्के एवढी किंमत कमी होणार असेल तर प्रत्येक एकराचा ठिबक सिंचन संच बसविण्याचा खर्च २५ ते ३० हजारांच्या दरम्यान होईल आणि त्यात सरकार सध्या ५० ते ६० टक्के सबसिडी देते. ती दिल्यास एक एकर ठिबक सिंचन बसवण्याचा खर्च जास्तीत जास्त १५ ते २० हजार रुपये एवढा येईल. हे सारे असे खरोखर घडले तर आपल्या देशामध्ये शेती व्यवसायात प्रचंड मोठी क्रांती होईल. त्याशिवाय पाण्याची फार मोठी बचत होऊन शहरांचे आणि उद्योगांचे पाण्याचे प्रश्न सुटण्यास मदत होईल.

सध्या पाणी हा सर्वांच्या चिंतेचा विषय झाला आहे. कारण पाण्याची उपलब्धता कमी आणि मागणी जास्त झाली आहे. त्यातच आपण जमिनीतले पाणी अगदी खोलात जाऊन उपसायला लागलो आहोत. त्यामुळे पाण्यापायी सर्वांनाच विस्थापित होण्याची वेळ येते की काय, अशी शंका वाटायला लागली आहे. परंतु आपण पाण्याचे ऑडिट केले आणि पाण्याच्या वापराचे आकडे सरळपणे समोर ठेवले तर असे लक्षात येते की, पाण्याची समस्या दाखवली जाते तेवढी गंभीर नाही. कारण आपल्याला उपलब्ध होणार्याे पाण्यापैकी ९० टक्के पाणी शेतीसाठी वापरले जात असते. त्यातल्या त्यात उसाला फारच पाणी लागते. म्हणून काही कृषी तंत्रज्ञांनी असा दावा केला आहे की, महाराष्ट्रातली एक लाख हेक्टर क्षेत्रातली ऊस शेती बंद केली तर राज्यातल्या सगळ्या शहरांना दिवसातून दोन वेळा मुलबक पाणी पुरवता येईल.

राज्यामध्ये जवळपास ४० लाख हेक्टर जमिनीवर ऊस लावला जातो. त्यासाठी होणारा पाण्याचा वापर विचारात घेतला तर उपलब्ध पाण्याचा किती मोठा हिस्सा उसासाठी वापरला जात असतो याची कल्पना येईल. अर्थात त्यासाठी खरोखर ऊस शेती बंद करण्याची काही गरज नाही. ठिबक सिंचन हा त्यावरचा उपाय आहे.

आपल्या देशातल्या शेतकर्यांाच्या मनामध्ये पाणी आणि शेती यांच्याविषयी काही विक्षिप्त कल्पना निर्माण झालेल्या आहेत. शेताला जेवढे जास्त पाणी दिले जाईल तेवढे चांगले पीक येईल, अशी कल्पना शेतकर्यां च्या मनात खोलवर होत गेली आहे. त्यामुळे ते आपल्या पिकाला भरपूर पाणी देत बसतात. परंतु पिकाला भरपूर पाणी लागत नसते तर नेमके आणि माफक पाणी वेळेवर लागत असते. या गोष्टी साध्य करण्यासाठी मोकाटपणे पाणी देण्यापेक्षा ठिबक सिंचन ने पाणी दिले पाहिजे. त्यामुळे पाण्याची बचत तर होईलच पण शेतीसुद्धा फायदेशीर होईल. आपण शेतकर्यांजच्या उत्पादन खर्चाचा कानोसा घेतला तर असे लक्षात येते की, शेतामध्ये आधी भरपूर पाणी देण्यासाठी खर्च केला जातो. ते पाणी केवळ पिकाच्या बुडाशी न जाता रानभर जाते आणि सर्वत्र तण उगवते. असे बेसुमार तण झाले की, ते तण पिकासाठी दिलेले खत खाऊन टाकते. शिवाय ते तण काढण्यासाठी खुरपण करावे लागते आणि त्यासाठी भरपूर महिला शेतमजूर कामाला लागतात. बरेचसे शेतकरी खुरपणाच्या खर्चामुळे जेरीस आलेले असतात. परंतु वास्तवात हा खुरपणाचा खर्च त्यांनी भरपूर खर्च करून दिलेल्या पाण्यातून निर्माण झालेला असतो. असे शेतामध्ये तण खूप माजले की, पिकावर पडणार्या् किडींना आश्रय मिळतो आणि कीटकनाशके मारावी लागतात.

एकंदरीत पाणी जास्त दिल्यामुळे पाणी देण्याचा खर्च, खुरपणाचा खर्च आणि कीटकनाशकांचा खर्च असे सगळेच खर्च वाढतात. त्या ऐवजी ठिबक सिंचनाने पाणी दिले तर पाण्याची निम्मी बचत होते, तण वाढत नाही आणि खुरपण तसेच औषध फवारण्या हे सगळेच खर्च वाचतात. ठिबक सिंचन चा आणखी एक उपयोग होतो. या सिंचनामुळे ठिबक सिंचनाच्या पाण्यातूनच विद्राव्य रासायनिक खते देता येतात. त्यातून तर रासायनिक खतांचा खर्च ९० टक्क्यांनी कमी होतो. रासायनिक खतांच्या किमती पाहिल्या म्हणजे ही बचत किती अनमोल आहे हे लक्षात येईल. असे हे ठिबक सिंचनाचे तंत्रज्ञान शेतीचा खर्च वाचवण्यास उपयुक्त ठरते. सध्या शेतकर्यांाचा हाच प्रश्न गंभीर झालेला आहे. त्याला दिलासा मिळेल.

मात्र हे सगळे खरे असले तरी ठिबक सिंचनाचा संच बसवणे शेतकर्यां ना परवडले तरच हे सगळे शक्य आहे. तूर्तास शेतकर्यांिना ठिबक सिचनाची फारशी माहितीच नाही. ठिबक सिंचन केवळ श्रीमंत शेतकर्यां साठीच असते असा सर्वसामान्य शेतकर्यांफचा ग्रह आहे. यातून त्याला बाहेर काढावे लागेल. तसे केल्यास आणि त्याला स्वस्तात हा संच दिल्यास शेतीचे आणि पाण्याचे दोन्ही प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.