शिवसेनेच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन

मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृती अस्वास्थ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे आमदार आणि खासदारांची तातडीची बैठक मुंबईत आयोजित केली आहे. या बैठकीत शिवसेनाप्रमुखांच्या तब्येतीबाबत माहिती दिली जाणार असून शिवसैनिकांच्या मनातील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल; अशी माहिती शिवसेना सूत्रांनी ‘माझा पेपर’शी बोलताना दिली.

वर्षानुवर्ष शिवसेनेचा दसरा मेळावा दणाणून सोडणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या वर्षीच्या मेळाव्याला उपस्थित राहू शकले नाहीत. या मेळाव्यात ऐकविण्यात आलेल्या ध्वनिमुद्रित भाषणात शिवसेनाप्रमुखांनी स्वत:च आपल्या तब्येतीची स्थिती ठीक नसल्याचे निवेदन केले. तेव्हापासून केवळ शिवसैनिकांमध्येच नव्हे तर एकूणच राजकीय, सामाजिक क्षेत्र आणि बाळासाहेबांच्या हितचिंतकांच्या मनात चिंतेचे वातावण आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, गानकोकीळा लता मंगेशकर, अभिनेता नाना पाटेकर यांच्यासह अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेनाप्रमुखांची भेट घेतली.

या घडामोडींमुळे शिवसैनिक आणि पक्षाचे सहानुभूतीदार यांच्या मनात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा संभ्रम दूर करण्यासाठीच ही बैठक बोलाविण्यात आल्याचे शिवसेना सूत्रांचे म्हणणे आहे.

Leave a Comment