भारतालाही वादळाचा तडाखा

अमेरिकेला सध्या सँडी वादळाने उद्ध्वस्त करून टाकले आहे. मात्र अमेरिकेला बरबाद करणार्याढ या वादळाचा अप्रत्यक्ष परिणाम म्हणून व्हिएतनाम, चीन आणि भारत या तीन देशांनाही चक्री वादळाचे तडाखे बसले आहेत. चीन आणि व्हिएतनाममध्ये वादळामुळे ५० लोक मारले गेले असून भारतामध्ये अजून तरी या वादळाने प्राणहानी झालेली नाही. मात्र येत्या ४८ तासात हे वादळ पुडुचेरी आणि आंध्र प्रदेशाच्या काही भागांना तडाखा देऊ शकेल अशी शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

अमेरिकेच्या ईशान्य भागात हैदोस घातलेल्या सँडी वादळात वार्याहचा वेग ८५ कि.मी. प्रती तास असा होता. परंतु भारतामध्ये येत्या दोन दिवसात जे वादळ येणार आहे त्या वादळात वार्या चा वेग १०० कि.मी. प्रती तास असा राहणार आहे. हे वेगाचे आकडे पाहिले म्हणजे भारताला बसणारा वादळाचा तडाखा अमेरिकेला बसलेल्या तडाख्यापेक्षा तीव्र असेल हे लक्षात येते. अर्थात यामागे अमेरिकेला दणका देणारे वादळ हे सौम्य होते असे म्हणण्याचा हेतू नाही. परंतु भारतासारख्या देशात छोटे वादळ झाले तरी मोठी प्राणहानी आणि वित्तहानी होते. उलट अमेरिकेसारख्या देशात वादळ मोठे असले तरी नुकसान मात्र त्यामानाने कमी होते.

अमेरिकेला बसलेल्या वादळाचा उपद्रव त्या देशातल्या १२ राज्यांना झालेला आहे आणि त्यातल्या सहा राज्यांमध्ये सरकारला आणीबाणीची घोषणा करावी लागली आहे. ही सहा राज्ये अमेरिकेतली प्रगत राज्ये आहेत आणि ती समुद्रालगत असल्यामुळे व्यापाराची मोठी केंद्रे आहेत. अमेरिकेतली सर्वात मोठी दोन शहरे न्यूयॉर्क आणि वॉशिग्टन याच भागात आहेत. त्याशिवाय न्यू जर्सी, फिलाडेल्फिया, कनेक्टीकट, मेरिलँड अशीही समृद्ध राज्ये संकटग्रस्त झालेली आहेत. त्यामुळे अमेरिकेत होणारी वित्तहानी प्रचंड आहे. तिथे अनेक घरे पडलेली आहेत. अमेरिका आणि कॅनडा या दोन देशात मिळून १२२ जण प्राणास मुकले आहेत. त्यातील ५५ लोक अमेरिकेतील आहेत. अमेरिकेचा बराच मोठा भाग वीज बंद पडल्यामुळे पूर्णपणे अंधारात बुडला आहे. न्यूयॉर्कचा शेअरबाजार गेल्या सव्वाशे वर्षात पहिल्यांदाच बंद राहिला आहे. अमेरिके सारखा प्रगत देश सुद्धा वादळाच्या या संकटाने हतबुद्ध झाला आहे. भारतात तर अशा वादळासारख्या संकटामुळे मोठीच तबाही होत असते. कारण साधारणतः भारतामध्ये समुद्रकिनारी राहणारे लोक कच्च्या घरात राहतात.

अशी घरे वादळात उद्ध्वस्त होऊन जातात आणि त्यात प्रामुख्याने गरीबच लोक रहात असल्यामुळे ती पूर्णपणे विस्थापित होऊन जातात. त्यांचे पुनर्वसन करणे हे सरकारचे कर्तव्य आहे खरे, पण आपल्या देशातली सरकारी व्यवस्था त्यांचे पुनर्वसन योग्य प्रकारे करत नाही. आता उद्भवलेल्या वादळाने आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्हा तसेच पुडुचेरी हे पूर्ण राज्य बरबाद होणार आहे. त्यातल्या शेतकर्यांलची अवस्था तर फारच शोचनीय होते. कारण वादळाने आणि समुद्रातून आलेल्या लाटांमुळे उभी पिके वाहून जातात आणि हाताशी आलेला हंगाम वाया जातो. अशा अवस्थेत उत्पन्नाचे साधन हातात रहात नाही. पिके वाहून गेल्यामुळे दुसर्याआ पेरणीसाठी वाट पहावी तर स्थिती पूर्ववत व्हायला काही महिने लागतात.

एकंदरीत एखादे छोटे वादळ सुद्धा भारतातल्या हजारो लोकांना बेघर आणि बरबाद करत असते. अशावेळी सरकार पुरेशा क्षमतेने मदत जाहीर करतही नाही आणि केली तरी ती या खर्यां गरजू लोकांपर्यंत पोचत नाही. सरकारी कामातली ही रड आपल्याला वर्षानुवर्षे माहीत झालेली आहे. अशा प्रकारच्या संकटाची शक्यता तमिळनाडू, आंध्र प्रदेश, ओरिसा, पश्चिम बंगाल या राज्यांना नेहमीच भेडसावत असते. परंतु अशा संकटातून या राज्यातल्या गरीब लोकांचे कमीत कमी नुकसान व्हावे, अशी कायम स्वरूपी कसलीही व्यवस्था आपले सरकार उभी करत नाही.

निसर्गाच्या या तांडवाचा आगाऊ अंदाज आला तर धोका असलेल्या लोकांना आणि वस्त्यांना हलवता तरी येते. परंतु हवामान शास्त्राच्या आतापर्यंत झालेल्या विकासानुसार या वादळाचा आगाऊ अंदाज वर्तवता येत नाही. अजून तरी धोक्याचा इशारा देण्याबाबत तेवढे संशोधन झालेले नाही. कारण आता सध्या आलेल्या वादळासारखी वादळे ही खोल समुद्रात निर्माण झालेल्या काही प्रक्रियांचा परिणाम असतात. जगातल्या सगळ्याच समुद्रांमध्ये नित्य लहान-मोठी वादळे निर्माण होत असतात आणि त्यातली काही वादळे असे रौद्र रूप धारण करत असतात. त्यातली कोणती वादळे शमतील आणि कोणती वादळे विनाशक रूप धारण करतील, याचा अंदाज येत नाही. अशा प्रकारचे हे वादळ आंध्रात आल्यामुळे महाराष्ट्राच्या काही भागात पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. आक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आपला वर्षभरासाठी निरोप घेऊन गेलेला पाऊस असा अवकाळी स्वरूपात पुन्हा प्रकटला आहे. आंध्र प्रदेशाचे हे संकट आणि तमिळनाडूवर कोसळलेली ही आपत्ती महाराष्ट्राच्या काही धरणातील पाण्याचा साठा वाढविण्यास उपयुक्त ठरणार आहे. परंतु काही पिकांसाठी ती धोकादायक ठरणार आहे.