महाराष्ट्रातील महत्त्वाच्या पर्यटन स्थळांची डॉक्युमेंटरी

पुणे दि.३१ – महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने महाराष्ट्रातील महत्त्वाच्या पर्यटन स्थळांवर डॉक्युमेंटरी करण्याचा कार्यक्रम हाती घेतला असून या डॉक्युमेंटरीज आंतरराष्ट्रीय पर्यटन चॅनलवरून फेब्रुवारी २०१३ मध्ये प्रसारित केल्या जाणार असल्याचे समजते. परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी या डॉक्युमेंटरी तयार करण्यात येत आहेत.

याविषयी अधिक माहिती देताना महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक जगदीश पाटील म्हणाले की अशा सहा डॉक्युमेंटरी तयार करण्यात येत असून त्यात हेरिटेज, ऐतिहासिक महत्त्वाच्या तसेच धार्मिक स्थळांच्या माहितीचा समावेश आहे. यात प्रामुख्याने मुंबई, पुणे व परिसरातील गडकिल्ले, कोंकण, विदर्भ, मराठवाडा भागातील पर्यटन स्थळांचा समावेश आहे. सध्या कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे चित्रीकरण पूर्ण झाले असून नंतर कोल्हापूरमधील मल्ल आखाडे, रंकाळा, न्यू पॅलेस यांच्याबरोबरच वैशिष्ठ्यपूर्ण कोल्हापूरी चप्पल यांच्याबाबतची माहिती चित्रित करण्यात येणार आहे.

पाटील म्हणाले की प्रसारणासाठी सहा डॉक्युमेंटरीज तयार करण्यात येत असून मुंबईसाठी विशेष एपिसोड आहे. अन्य एपिसोडमधून गडकिल्ले, महाराष्ट्राची संस्कृती, वारसा दाखविला जाईल. महाराष्ट्रात शहरीकरणाचा वेग अलिकडे मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे परदेशी पर्यटकांच्या निवासासाठी चांगल्या सोयी उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ पुण्यात राहून पर्यटक पांचगणी, महाबळेश्वर प्रमाणेच जवळपासचे गड किल्लेही पाहू शकणार आहेत. सिंहगड, राजगड, लोहगड आणि शिवनेरी या गडांचा यात समावेश असून लोणारचे ऐतिहासिक उल्का सरोवर तसेच कोंकणातले निसर्गरम्य समुद्र किनारेही यात समाविष्ट करण्यात आले आहेत.

Leave a Comment