छडी लागे छम छम

शाळेतल्या मुलांना शिक्षा करणे हा आता गंभीर अपराध समजला जाणार आहे आणि त्यामुळे शिक्षकांमध्ये त्याचबरोबर काही पालकांमध्येसुध्दा खळबळ उडाली आहे. आपल्या मुलाच्या शिक्षकांनी त्याला मारता कामा नये असे बर्या च पालकांना वाटते परंतु शाळेत शिक्षा झाल्याशिवाय मुलांना ज्ञान येणार नाही असाही विचार करणारा एक वर्ग आपल्या समाजात आहे. त्यामुळे सरकार शिक्षेच्या विरोधात जे कायदे करते त्यांच्याबाबत प्रतिकूल टीका टिप्पणी करणारा एक वर्ग असतोच.

पूर्वीच्या काळी शिक्षक फार मारत असत एवढेच नव्हे तर वेताच्या छडीने मुलांना फोडून काढत असत आणि तिच पध्दत योग्य होती असे म्हणणारे अविचारी लोक अजूनही आपल्या समाजात आहेत. असा विचार करणारे शिक्षक हे तर विद्यार्थ्यांचे शत्रूच ठरलेले आहेत आणि एक एक शिक्षक वरचेवर अघोरी शिक्षा मुलांना करायला लागले आहेत. त्यातल्या एक एक शिक्षा पहिल्या म्हणजे हे शिक्षक म्हणजे माणसे आहेत की जनावरे हा प्रश्न आपल्याला पडतो. अशा लोकांना कायद्याने खरोखरच कडक शिक्षा केली पाहिजे.

कोणत्याही सुधारलेल्या देशामध्ये मुलांना शिक्षा करणे बंद झालेले आहे. अमेरिकेत तर मुलांना शिक्षा करणारे शिक्षकच काय पण मुलांचे आईबाप सुध्दा शिक्षेस पात्र ठरतात. आईवडीलांनी आपल्या मुलांना मारणे हा सुध्दा अमेरिकेत गुन्हा ठरतो. या सगळ्या सुधारणांमागे एक मुलभूत कल्पना आहे आणि ती विसरल्यामुळे काही लोकांचा शिक्षेविरुध्दच्या कायद्याविषयी गैरसमज होतो. लहान मूल मग ते कितीका असमंजस असेना ते स्वतंत्र व्यक्तिमत्व असते. त्याचा स्वतःचा अभिमान असतो. त्याला स्वतःला एक अस्मिता असते. त्याच्या परीने ते स्वतःविषयी विचार करत असते. त्यामुळे त्याच्या व्यक्तिमत्वाचा आदर करणे हे पालकांचे आणि शिक्षकांचे कर्तव्य असते.

परंतु प्रत्येक मुलगा बिघडणाराच असतो, तो खोडकरच असतो, तो वाया जाणाराच असतो त्यामुळे त्याला सरळ करणे हेच आपले काम आहे असा काहीसा विपरित विचार हे पालक आणि शिक्षक करत असतात. एखाद्या ओढाळ जनावराला ताब्यात ठेवण्यासाठी जसा चाबुक वापरावा लागतो तसा मुलासाठी चाबुक वापरला नाही तर ते मूल वाया जाईल आणि सतत चाबकाने फोडून काढले किवा नजरेच्या जरबेत ठेवले तरच तो चांगला नागरिक होईल अशी या लोकांची मध्ययुगीन कल्पना असते.

एखादा पालक किंवा शिक्षक मुलाला मारतो आणि आपण त्याच्या भल्यासाठीच शिक्षा केलेली आहे. असा स्वतःच्या मनाचा समज करून घेतो खरे म्हणजे हा त्याचा गैरसमज असतो. मुलगा बिघडण्याची शक्यता असतेच परंतु तो बिघडू नये यासाठी अनेक अहिंसक उपाय असतात आणि त्या उपायांनी मुलांना सुधरवणे यात त्या पालकांचे आणि शिक्षकांचे कौशल्य सामावलेले असते. पण त्याऐवजी हे लोक मुलांना मारत सुटतात हे त्याच्या कल्याणाचे काम नसते तर अहिंसक पध्दतीने मुलाला सुधरवण्यातील त्यांची असमर्थता त्यात व्यक्त होत असते. त्यामुळे ज्या पालकांना किवा शिक्षकांना मुलांना मारावेसे वाटते त्यांनी मुलाच्या बाबतीत विचार करण्याऐवजी स्वतःच्या बाबतीत विचार केला पाहिजे आणि आपण चांगला पालक किवा चांगला शिक्षक होण्यास पात्र आहोत की नाही या बाबतीत आत्मपरीक्षण केले पाहिजे.

मुलांना शिक्षण देण्यासाठी शिक्षा केली पाहिजे असा फार जुना समज आहे. म्हणून हिंदीमध्ये कदाचित शिक्षणाला शिक्षा म्हणण्याची पध्दती आहे. अर्थात ती अनुचित आहे.  छडी लागल्याशिवाय विद्या येत नाही ही म्हण त्यातूनच जन्माला आलेली आहे. आपल्या देशात शिक्षण घेणार्या  विद्यार्थ्यांना शिक्षक नकोसा वाटतो. त्यामुळे त्याला अभ्यासात रूची निर्माण होत नाही. असे का वाटते. याचा विचार शिक्षकांनी केला पाहिजे. मुलांनी शिक्षणाला ओझे समजता कामा नये. शिक्षकांची दहशत, आईवडिलांच्या अपेक्षांचे मानसिक ओझे आणि दप्तराचे भौतिक ओझे, परीक्षेचा तणाव आणि निकालाची काळजी एवढे होऊन सुध्दा भविष्याविषयी अनिश्चितता अशी  अनेक प्रकारची ओझी घेऊन मुले शिकत असतात. केवळ शिक्षेचेच ओझे नव्हे तर ही सगळीच ओझी कमी केल्याशिवाय मुलांसाठी शिक्षण आनंददायी होणार नाही.

काही मुलांच्या दप्तरांचे ओझे एवढे असते की त्यांच्या पालकांना सुध्दा ते उचलत नाही. पाठीवर आपल्या स्वतःच्या आकारापेक्षा मोठी आणि स्वतःच्या वजनापेक्षा अधिक वजनाची पोती घेऊन जाणारी लहान लहान मुले पाहिली की त्यांची कीव येते. शिक्षणाच्या नावावर आपण त्यांच्यावर किती ओझी लादत आहोत याचा आधीच्या पिढीने कधी विचारच केलेला नाही आणि या सगळ्या ओझ्यांमधून मुलांचे व्यक्तिमत्व घडावे अशी अपेक्षा आपण करत आहोत. खरे म्हणजे ही लहान मुले व्यक्तिमत्वे राहीलेली नसून ओझी वाहणारी गाढवे झालेली आहेत. मात्र त्यांचे हे ओझे कमीत कमी कसे होईल याचा प्रयत्न कोणीही गांभीर्याने करत नाहीत. हा शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा आहे. ज्याच्यासाठी शिक्षण आहे त्या कोवळ्या मुलांचे मन आणि त्यांचे शरीर, बुध्दी एवढ्या गोष्टींचा विचार सोडून ही शिक्षण पध्दती राबविली जात आहे. ती पाहिली म्हणजे मनापासून म्हणावेसे वाटते शिक्षणाच्या आयचा घो.

Leave a Comment