मुंबईतील चार ठिकाणची सुरक्षा वाढविली

मुंबई दि.३०- पुण्यात १ ऑगस्ट रोजी झालेल्या बॉम्बस्फोटातील तीन संशयित आरोपींकडून दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने मिळविलेल्या माहितीनुसार मुंबईत नवरात्र दिवाळी या सणांमध्ये बॉम्बस्फोट करण्याचा कट उघडकीस आला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. दिल्ली पोलिस विशेष पथकाने मुंबई दहशतवाद विरोधी पथक तसेच मुंबई पोलिसांना बांद्रा बस डेपो, अंधेरी पश्चिम येथील मॅकडोनाल्ड रेस्टॉरंट, जोगेश्वरी फ्लायओव्हर ब्रीज व जूहू बीचवर सुरक्षा कडक करण्यासंबंधीचे पत्र पाठविले असल्याचे समजते.

पुण्यातील स्फोटात सहभाग असलेले व सध्या दिल्ली पोलिस विशेष पथकाच्या ताब्यात असलेले आसदखान, इम्रानखान व सय्यद फिरोज यांनी हे स्फोट येरवडा कारागृहात  करण्यात आलेल्या इंडियन मुजाहिद्दीन सदस्य कातील याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी केले गेल्याचा कबुलीजबाब दिला असून नवरात्र आणि दिवाळीत मुंबईला टार्गेट करण्याची योजना आखली गेल्याचेही कबुल केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र अेटीएस व मुंबई पोलिसांना दिल्ली पोलिसांनी सावधानतेचा संदेश दिला आहे.

मुंबई पोलिस उपायुक्त झोन ९ चे प्रताप दीघावकर यांनी दिल्ली पोलिसांच्या पत्राबद्दल चुप्पी बाळगली असली तरी वरील चार ठिकाणची सुरक्षा यापूर्वीच वाढविली गेली असल्याचे सांगितले आहे. सणांच्या काळात एकूणच सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली जाते व हे रूटीन आहे असेही ते यावेळी म्हणाले.

Leave a Comment