सुरक्षा उपकरण उद्योगाची घोडदौड सुरूच

मुंबई दि. २९- मुंबईवर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशातील सुरक्षा उपकरणे उद्योगाला एकदमच चालना मिळाली असून गेल्या तीन वर्षात या उद्योगाने तब्बल २५ टक्के वाढ नोंदविली आहे. तज्ञांच्या मते आणखी कांही वर्षे हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. 

वाढता दहशतवाद, धमक्यांचे वाढते प्रकार तसेच गुन्ह्यांच्या प्रमाणात होत असलेली वाढ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुरक्षा उपकरणांबाबत नागरिकांत झालेली जागृती ही हा उद्योग वाढण्यामागची प्रमुख कारणे सांगितली जात आहेत. भारतात आज हा उद्योग ५००० कोटींच्या घरात गेला आहे. जागतिक सुरक्षा उपकरणे उद्योग सात टक्के वाढ दाखवित असताना भारतात मात्र ही वाढ २५ ते ३० टक्कयांदरम्यान आहे असे होमलँड सिक्युरिटी व इंटरनॅशनल फायर सिक्युरिटी कार्पोरेशन इंडियाचे प्रोजेक्ट डायरेक्टर पंकज जैन यांनी सांगितले.

जैन म्हणाले की ग्रेटर नॉयडात इंडिया एक्स्पो सेंटरमध्ये १ नोव्हेंबरपासून भरत असलेल्या तीन दिवसांच्या प्रदर्शनात २५० सिक्युरिटी उद्योगातील कंपन्या सहभागी होत आहेत. जगभरातील वीस देशांतील या कंपन्या आहेत. जगातील लिडिंग यूबीएम इंडिया कंपनी होस्ट आहे. या प्रदर्शनात सीसीटिव्ही, सुरक्षेसंबंधीची अन्य उपकरणे, बायोमेट्रिक उपकरणे, इन्ट्रूडर अलार्म, फायर अलार्म अशा अनेक उपकरणांचे प्रदर्शन केले जाणार आहे.

मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाचे उपायुक्त अंबादास पोटे याबाबत बोलताना म्हणाले की सध्याच्या युगात सुरक्षेसाठीची योग्य ती उपाययोजना करणे आवश्यकच असून नागरिकांनी सुरक्षा उपकरणांसाठी केलेला खर्च हा खर्च न धरता ती गुंतवणूक मानायला हवी. मात्र नागरिकांना आता सुरक्षा उपकरणांची गरज पटली असून मुंबई हल्ल्यापासून या उपकरणांची मागणीही बरीच वाढली असल्याचे दिसून येत आहे.

 

Leave a Comment