सहकार क्षेत्रात पाय रोवण्याची मनसेची तयारी

मुंबई दि .२९ – राज्यात २०१४ सालात होत असलेल्या विधानसभा निवडणूकात नागरी तसेच ग्रामीण भागातही पक्षाची पाळेमुळे रोवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तयारी सुरू केली असून सहकार क्षेत्रात आपले पाय रोवण्याचा निर्णय अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतला असल्याचे समजते. मनसेचे अस्तित्व सध्या तरी शहरांपुरते मर्यादित आहे. राज्यभर मनसेचे अस्तित्त्व निर्माण होण्यासाठी नागरी आणि ग्रामीण भागावरही लक्ष देणे भाग असून येथे सत्तेच्या चाव्या ज्या सहकार क्षेत्रांच्या हातात असतात तेथे शिरकाव करण्याची तयारी मनसेने चालविली आहे. यात सहकारी हौसिंग सोसायट्यापासून पार सहकारी साखर कारखान्यांपर्यंत सर्व क्षेत्रे निश्चीत करण्यात आली आहेत असे खात्रीलायक वृत्त आहे.

सध्या सहकार क्षेत्रावर सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेच वर्चस्व आहे. शिवसेना आणि भाजपचे अस्तित्त्व अगदी किरकोळ स्वरूपात आहे. मनसे सहकार सेनेचे अध्यक्ष शिवाजीराव नलावडे या संबंधात माहिती देताना म्हणाले की आम्हाला राजकीय पक्ष म्हणून वाढायचे असेल तर गृहनिर्माण संस्थांपासून जिल्हा बॅका, दूध, जलसिंचन आणि साखर या सहकारी क्षेत्रांकडेही लक्ष देणे भाग आहे. केवळ मराठी बाणा राज्यात सत्ता मिळविण्यास उपयुक्त नाही. त्यामुळे मनसेने ग्रास रूट पातळीपासून सहकारी क्षेत्रांत पाय रोवण्याची तयारी सुरू केली आहे. नलावडे हे राष्ट्रवादीतून मनसेत आले आहेत.

नलावडे म्हणाले की या दृष्टीने आम्ही कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देणार आहोत. सहकारी संस्था फायद्यात कशा चालवायच्या, त्यांचे नियम काय असतात याचे शिक्षण या कार्यकर्त्यांना दिले जाणार आहे. मुंबईसारख्या शहरात सहकारी गृहनिर्माण संस्था महत्त्वाच्या असतात तर ग्रामीण भागात जिल्हा बॅका ,दूध संघ, साखर कारखाने महत्त्वाचे असतात. लोकसभेच्या निवडणुकांतही याचा फायदा पक्षाला खासदारांची संख्या वाढविण्यात मिळू शकणार आहे असेही ते म्हणाले.

Leave a Comment