एसटी कर्मचार्‍यांच्या मोर्चात राज ठाकरे सहभागी होणार

मुंबई दि.२९ – महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट म्हणजेच एसटीचे कर्मचारी त्यांच्या अनेक दिवसांपासूनच्या मागण्यासाठी मुंबईत काढणार असलेल्या मोर्चात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सहभागी होणार आहेत असे पत्रकारांना सांगण्यात आले. येत्या १ नोव्हेंबरला आझाद मैदान ते मुंबई सेंट्रल असा हा मोर्चा काढला जाणार आहे.

मनसेच्या वाहतूक विंगचे प्रमुख अविनाश अभ्यंकर यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार गेली अनेक वर्षे एसटी कर्मचार्‍यांच्या विविध मागण्या दुर्लक्षिल्या जात आहेत. कर्मचार्‍यांना अत्यंत अपुरे वेतन दिले जाते आहे आणि पगारवाढीची मागणी पुरी केली जात नाही. या कर्मचार्‍यांना कोणतेच विशेष फायदेही मिळत नाहीत परिणामी कर्मचार्‍यांना अनेक अडचणींचा सामना सातत्याने करावा लागतो आहे. १ नोव्हेंबरला काढण्यात येणार्‍या मोर्चात १ लाख कर्मचारी सहभागी होणार आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेही त्यांच्यासोबत मोर्चात जाणार आहेत. या कर्मचार्‍यांच्या अडचणी नुसत्या समजून घेऊन चालणार नाही तर त्या सोडविण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे आणि मनसे त्यासाठी प्रयत्न करत आहे. या मोर्चानंतर कर्मचार्‍यांची परिस्थिती थोडी सुधारेल अशी अपेक्षा आहे असेही अभ्यंकर यांनी सांगितले.

 

Leave a Comment