शिवतीर्थावरचा निरोप समारंभ

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना यंदाच्या  दसरा मेळाव्यात हजेरी लावता आली नाही. गतवर्षीही त्यांनी हजेरी लावणार नाही असेच म्हटले होते पण प्रकृतीची तक्रार असतानाही त्यांनी उपस्थित राहून लाखो शिवसैनिकांना संदेश दिला होता. त्याच वेळी त्यांनी आपला नातू आदित्य यालाही व्यासपीठावर आणले आणि आपल्या तिसर्‍या पिढीचा आपल्या लाडक्या शिवसैनिकांशी परिचय करून दिला होता. यावर्षी ते आजारी असल्यामुळे मेळाव्याला हजेरी लावणार की नाही याविषयी अनेक तर्क लढवले जात होते. 

मुळात गेल्या काही वर्षांपासून शिवतीर्थावरच्या या अर्धशतकाच्या परंपरेत सरकार आणि  पोलिसांनी अडचणी आणायला सुरूवात केली आहे. आवाजाचे प्रदूषण आणि इतर अनेक बहाणे सांगून मेळाव्याला परवानगी देता येईल की नाही अशा शंकांच्या अफवा पसरवायला सुरूवात केली आहे. त्यामुळे शिवसैनिक हवालदिल होत असतात. मुळात मेळाव्याच्या विषयीच अशा कंड्या पिकवल्या की शिवसैनिकांचा उत्साह निम्म्याने मावळतो. मग राजकीय विरोधकांना आनंदाच्या उकळ्या फुटायला लागतात. त्यातच बाळासाहेबांच्या आगमना विषयी संदेहाची हवा पसरवली की उरला सुरला उत्साहही मावळतो.
अशा वातावरणातही बाळासाहेब व्यासपीठावर आले आणि त्यांनी शिवसेनेचा हा विक्रमी ४६ वा मेळावा साजरा केला

पण यंदा मेळाव्याच्या आधीच त्यांनी हजेरी  लावण्याबाबत असमर्थता व्यक्त करायला सुरूवात केली होती आणि हा ४७ वा मेळावा बाळासाहेबांच्या भाषणाशिवाय होतो की काय असे वाटून त्यांचे जीवाभावाचे शिवसैनिक हवालदिल झाले होते. बाळासाहेब आलेच नाहीत पण तंत्रज्ञानाने केलेल्या प्रगतीमुळे त्यांचे भाषण त्यांच्या अनुयायांना ऐकायला मिळाले. त्यांनी ते कानात प्राण आणून ऐकले आणि मनाच्या कुपीत कायमसाठी जपून ठेवले. या पुढे राज्यात काम करताना त्यांना हा संदेश प्रेरणा देत राहील यात काही शंका नाही. 

एका मैदानावर एका संघटनेचा प्रमुख दसर्‍याच्या याच दिवशी आपल्या लाखो अनुयायांना सतत ४७ वर्षे संबोधित करीत आहे ही भारतातलीच नाही तर सार्‍या जगातली एकमेव घटना आहे. असा विक्रम जगात कोणीच केलेला नाही. जगात अनेक नेते आले, मोठे झाले आणि त्यांची उपयोगिता संपली की उपेक्षेच्या पडद्याआड गेले. पण बाळासाहेब ठाकरे  हे जगातले असे एकमेव नेते आहेत की ज्यांच्या प्रभावाचे गारुड सतत ४७ वर्षे कायम आहे.

शिवसेनेच्या स्थापनेला ४७ वर्षे झाली आणि शिवसैनिकांनी या काळात तिला मोठे केले. बाळासाहेबांनी लाखो अनुयायी जमवले. त्यांच्या अनुयायांच्या तीन पिढ्या झाल्या पण बाळासाहेबांचा करिष्मा थोडाही कमी झाला नाही. १९६६ साली हा ढाण्या वाघ जितका त्वेषाने महाराष्ट्राच्या दुष्मनांवर तुटून पडत होता त्या त्वेषात आज काहीही फरक पडलेला नाही.  समोरच्या माणसाच्या हृदयाला हात घालणारी भाषा हे त्यांचे वैशिष्ट्य. शब्दात मिळमिळीतपणाला वाव नाही. सारे कसे रोखठोक आणि  परखड. एकदा फटकारे मारायला सुरूवात झाली की कोणाचाही मुलाहिजा ठेवणार नाही. नाठाळाच्या माथी काठीचा प्रहार करताना हातचे राखून ठेवणार नाही. कोणाची भीड नाही की कोणाची मुर्वत नाही. कोणत्या टीकेचे काय परिणाम होतील याची तिळमात्र काळजी नाही.  जे महाराष्ट्राच्या हिताचे आहे, जे देशाच्या कल्याणाचे आहे आणि जे हिंदुत्वाच्या बाजूचे आहे ते सांगताना कचरणार नाही. त्यांचे भाषण म्हणजे फटकार्‍यांची मेजवानी. शिवसैनिकांचे हात शिवशिवयाला लागणारच असे विलक्षण  पौरुषशाली आव्हान. शब्दाशब्दात अंगार आणि वाक्या वाक्यात ‘मर्दानगीका अहेसास’.  धारदार शब्द आणि चैतन्यभरला प्रतिसाद यांची ती मैफीलच.

४७ वर्षांपूर्वी प्रबोधनकार ठाकरे यांनी आपला हा ढाण्या वाघ महाराष्ट्राच्या पदरात घालताना जी अपेक्षा मनात ठेवली असेल ती पूर्ण केल्याचे विलक्षण समाधान बाळासाहेबांच्या मनात ओतप्रोत भरलेले आहे.  काल त्यांनी वयाच्या ८६ व्या वर्षी आपल्याला बोलण्याचा त्रास होत आहे असे म्हणत का होईना पण आपली पुढची पिढी त्या  विशाल संख्येने जमलेल्या मराठी माणसाच्या पदरात टाकली. त्या प्रसंगात बाळासाहेबांच्या अंतःकरणात केवळ उद्धव ठाकरे यांचाच पिता नव्हे तर अख्ख्या मराठी माणसाचा पिता जागा झाला होता. त्यांनी आपली ही पुढची पिढी म्हणजे घराणेशाही नाही असे म्हटले पण त्यातला अर्थ समजून घेतला पाहिजे. ती घराणेशाही सत्तेसाठीची नाही. ती घराणेशाही संघर्षाची आहे. सेवेची आहे. ती मराठी माणसाच्या हितासाठी अविरत लढण्याच्या व्रताची आहे. 

जी घराणेशाही स्वार्थासाठी असते ती घराणेशाही कोणालाच आवडत नाही. ठाकरे घराण्याची घराणेशाही ही तशी नाही कारण या घराण्यात कोणीच सत्तास्थानावर जात नाही आणि कोणत्याच पदाचा स्वीकार करीत नाही. म्हणून ही घराणेशाही नसून तो त्यागाचा वारसा आहे. तो स्वीकारल्याची पावती देताना सारा जनसागर हेलावला होता. असा भावनेने ओथंबलेला समारंभही विक्रमीच आहे. असे अनुयायांचे प्रेमही अपवादानेच लाभते. बाळासाहेबांची प्रकृती ठणठणीत होऊन पुढच्या मेळाव्याला ते हजर राहोत हीच प्रार्थना आपण करू.   

 

Leave a Comment