चक्रव्यूह – विचार करायला लावणारा चित्रपट

एका सशस्त्र नक्षलवाद्यांच्या कॅम्पमध्ये हजेरीसाठी उभ्या असलेल्या कबीर (अभय देओल)च्या लक्षात येत की, त्याच्या सोबतच्या व्यक्तीला वीसच्या पुढे पाढे येत नाही. तो एक ते वीसपर्यंत मोजणी झाल्यानंतर पुन्हा एकपासून मोजणी सुरु करतो. त्यामुळे या व्यक्तीला  मार्क्स आणि लेनिनबद्दल किती ठाऊक असेल या विचारात कबीर पडतो. यावरुन या भागात विकासाबरोबरच शिक्षणाचीही मोठी अडचण असल्याचे आपल्या लक्षात येतं.

आपण छत्तीसगडच्या जंगलात आहोत. भारताला स्वातंत्र्य मिळून ६५ वर्षे उलटल्यानंतरही या भागाला भारतीय नकाशावर स्थान प्राप्त होऊ शकले नाहीये. या भागातील नागरिक राज्यसत्तेचा शत्रू आहे. त्यामुळे सरकारला आपल्या लोकांशीच लढण्यासाठी फौज मागवावी लागते. स्थानिक रहिवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी आहेत. त्यांची सहानुभूती गुरिल्ला समुदायाबरोबर आहे. या समुदायाचे प्रतिनिधित्व राजन (मनोज बाजपेयीने उत्कृष्ट सादरीकरण केले आहे.) करतो.

कबीरचा सगळ्यात चांगला मित्र आदिल (अर्जुन रामपाल, आता अर्जुनचा अभिनयही चांगला होऊ लागला आहे.) आहे. आदिलला या भागाचा एसपी म्हणून पाठवण्यात येतं. येथे आरोग्य सेवा नाहीच्या बरोबरीत आहेत. येथे पोलिससुद्धा भीतीच्या सावटाखाली जगताना दिसतात. नक्षलवाद्यांच्या बंदुकीपासून वाचलो तर मलेरिया जीव घेईल ही भीती पोलिसांनादेखील वाटते.

कबीर आदिलचा खबरी म्हणून दहशतवाद्यांच्या समुहात सामिल होतो. कबीर स्वतःहून संकटाला सामोरे जातोय हे यावरुन स्पष्टच आहे. ही व्यक्ती आपल्या जिगरी मित्राचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःचे प्राण संकटात टाकतेय. आदिल स्वतः एक पोलिस आहे. तो अॅकॅडमीतून ट्रेनिंग घेऊन आला आहे. धष्टपुष्ट आहे. आदिलची पत्नीही पोलिस विभागात कामाला आहे. (या भूमिकेसाठी ईशा गुप्ताची निवड योग्य झाली असे म्हणता येणार नाही. ईशा चित्रपटात पोलिस आहे की एक मॉडेल हे प्रेक्षकांना शेवटपर्यंत समजत नाही.) 

आपल्या मित्राच्या मदतीसाठी कबील नक्षलवाद्यांच्या कॅम्पमध्ये सामील होतो खरा, मात्र नंतर तो स्वतःच राज्यसत्तेच्या विरोधात उभा होतो. कबीरने आपल्याला धोका दिला असे आदिल समजतो. ही स्टोरी आपल्याला राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चनच्या  नमक हराम (१९७३) या चित्रपटाची आठवण करुन देते.

मात्र  या सिनेमात नक्षलग्रस्तांच्या समस्या चांगल्याप्रकारे मांडण्यात आल्या आहेत. या चित्रपटातील अनेक दृश्ये सध्याच्या चर्चेत असलेल्या घटनांपासून प्रेरित असल्याची जाणवतात. इतकंच नाही तर चित्रपटात वापरण्यात आलेली नावेदेखील वृत्तपत्रांच्या शीर्षकांमधली वाटतात. उदाहरणार्थ, नंदीग्रामची आठवण करुन देणारे नंदीगढ, औद्योगिक घराणे वेदांताची आठवण करुण देणारे महंता, कम्युनिस्ट इंटेलेक्चुअल गोविंद सूर्यवंशी (ओम पुरी) ज्यांचे चरित्र चित्रण कदाचित कोबाद घांदीपासून प्रेरित असावे.

या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रकाश झा आहेत. यापूर्वी त्यांनी गंगाजल, अपहरण, राजनिती आणि आरक्षण यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. ’आरक्षण’ चित्रपटाच्या तुलनेत या चित्रपटात कमी नाटकीपणा आहे. चित्रपट एकीकडे नक्षलवाद्यांच्या महत्त्वकांक्षेची पडताळणी करतो, तर दुसरीकडे राजकारण, उद्योगजगतात होणार्‍या भ्रष्टाचाराचाही भांडाफोड करतो.

खरे तर चित्रपटातील नायक-खलनायकाचे स्पष्ट विभाजन करण्यात आलेले नाहीये. प्रेक्षक म्हणून कबीरला आपण नायकाच्या भूमिकेत बघत नाही. आदिलसुद्धा चित्रपटाचा नायक नाहीये. मात्र तरीदेखील दोन्ही प्रमुख व्यक्तीरेखा आपापल्या स्थानी योग्य आहेत.

बौद्धिक प्रामाणिकपणा ही या चित्रपटाची जमेची बाजू आहे. प्रेक्षक मसाला, एक्शन, थ्रिलर चित्रपटाबरोबर जुळून राहावा याकडे दिग्दर्शकाने जातीने लक्ष दिले आहे. हा मनोरंजनाबरोबरच एक सूचनात्मक आणि वैचारिक पठडीतला चित्रपट आहे.