इम्रानखानची टोरंटो विमानतळावर चौकशी

टोरंटो दि. २७ -पाकिस्तानचा क्रिकेटर व  आता राजकीय नेता असलेल्या इम्रानखान कॅनडातून अमेरिकेला जाण्यासाठी निघाला असताना शुक्रवारी त्याला विमानातून उतरवून त्याची सुमारे तास भर यूएस इमिग्रेशन अधिकार्‍यांनी चौकशी केली. त्यानंतर त्याला दुसर्‍या विमानातून अमेरिकेस जाऊ देण्यात आले.

याविषयी मिळालेल्या माहितीनुसार अमेरिक न एअरलाइन्सच्या विमानाने इम्रान टोरंटोहून न्यूयॉर्कला जात होता. लाँग आयलंड सिटीत तो फंडरेझिंग मेजवानीत भाषण करणार होता. कालच त्याने ब्रॅम्पटन येथेही राजकीय भाषण केले होते आणि त्यात अमेरिका पाकिस्तानवर सातत्याने करत असलेल्या ड्रोन हल्ल्याबाबत कांही मते व्यक्त केली होती. त्यामुळे त्याची चौकशी करण्यात आली आणि ड्रोन हल्ल्यांबाबत त्याचे काय मत आहे असेही त्याला विचारण्यात आले असल्याचे समजते.

इम्रानने तेहरीक ए इन्साफ या राजकीय पक्षाची स्थापना केली असून या पक्षातर्फे त्याने नुकतीच पाकिस्तानात ड्रोन हल्ल्याविरोधात रॅली काढली होती. तो तालिबान्यांचा पुरस्कर्ता असल्याचाही आरोप त्याच्यावर केला जातो. अमेरिकेत त्याच्याविरोधात निदर्शने करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत असून त्यामुळेच त्याची चौकशी केली असा खुलासा इमिग्रेशन अधिकार्‍यांनी केला आहे.