वॉशिग्टन दि.२६ – विकिलिक्सचा संस्थापक ज्युलियन असांजे लंडनमध्ये इक्वेडोर दूतावासात आपले दिवस घालवित असतानाच त्याच्या विकिलिक्स साईटने गुरूवारी अमेरिकी संरक्षण मंत्रालयाच्या अतिमहत्त्वाच्या १०० फायलीतील कागदपत्रे वेबसाईटवर उघड केली आहेत. या कागदपत्रात ग्वाटानामो बे येथील प्रिझनरना कशी वागणूक द्यायची यासंबंधीचे मॅन्यूअल तसेच इराण आणि अफगाणिस्तान वरील हल्ल्यासबंधीची कागदपत्रेही आहेत.
असांजे याविषयी बोलताना म्हणाला की अमेरिकेवर झालेल्या ९/११ च्या हल्ल्यानंतर तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी तालिबानी आणि अलकैदाच्या संशयित सदस्यांना ग्वाटानामो बे येथे नजरकैदेत ठेवण्यात यावे असे आदेश दिले होते त्याची कागदपत्रेही वेबसाईटवर देण्यात आली आहेत. या तुरूंगात मानवी अधिकार, हक्क आणि कायदा याची कशी पायामल्ली केली जात होती याचे स्पष्ट दर्शनच या कागदपत्रांतून होत आहे.
बराक ओबामा यांनी २००९ साली अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर हा तुरूंग बंद करण्याची घोषणा केली होती मात्र काँग्रेसच्या विरोधाने ते आजही हा निर्णय अमलात आणू शकलेले नाहीत. असांजे बलात्कार आणि लैंगिक छळाच्या आरोपांवरून स्वीडनला हवा आहे मात्र ब्रिटनने त्याचे हस्तांतरण करण्यापूर्वीच त्याने इक्वेडोर दूतावासात आश्रय घेतला असून या देशाने त्याला राजकीय आश्रय देण्याचे मान्य केले आहे. सध्या असांजे आजारी असून त्याचे वजन घटले आहे आणि त्याला डोळ्यांचाही त्रास होत आहे. त्यामुळे इक्वेडोरचे अधिकारी यासंबंधात ब्रिटनच्या अधिकार्यांआशी चर्चा करणार आहेत असेही समजते.