विंडोज आठ बाजारात दाखल

मायक्रोसॉफ्टची बहुप्रतिक्षित विंडोज आठ ही नवी ऑपरेटिंग सिस्टीम गुरूवारी बाजारात दाखल झाली असून आजपासून म्हणजे शुक्रवारपासून तिची विक्री सुरू झाली आहे. अनेक वैशिष्ठ्यांसह बाजारात आलेली ही सिस्टीम विंडोज युजर अपग्रेड करू शकणार आहेत. त्यासाठीची ऑनलाईन सुविधाही सुरू करण्यात आली आहे मात्र त्यासाठी किमान ३९.९९ डॉलर्स युजरला भरावे लागणार आहेत असे कंपनीचे अध्यक्ष स्टीफन स्त्रिफेस्की यांनी जाहीर केले आहे.

विंडोज आठ सिस्टीम विंडोज सातच्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरला पूरक असून युजर  माऊस, की बोर्ड आणि टचबरोबर काम करू शकणार आहे. दीर्घकाळ चालणारी बॅटरी आणि वेगवान बूटींग ही या सिस्टीमची वैशिष्ठे आहेत तसेच या विंडोज आठ वर अॅप्लीकेशनची अपडेट माहितीही युजरला उपलब्ध होऊ शकणार आहे असेही कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे.