वॉशिंग्टन,२६ ऑक्टोबर-गुगलची अंडरोईड ऑपरेटिंग सिस्टिम मायक्रोसॉफ्टच्या विंडोज ऑपरेटिंग सिस्टिमला युझर्सच्या संख्येत मागे टाकणार असल्याचा दावा गार्टनर या सर्वेक्षण कंपनीने केला आहे. २०१६ च्या सरते शेवटी सुमारे २.३ अब्ज संगणक, टॅबलेट आणि स्मार्टफोन अंडरोईडचा वापर करीत असतील तर २.२८ अब्ज डिव्हाईसवर विंडोज ऑपरेटिंग सिस्टिम असेल, असे कंपनीने म्हटले आहे.
तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील ठळक बदल नोंदवित गार्टनर या सर्वेक्षण कंपनीने अंडरोईड ऑपरेटिंग सिस्टिमच्या युझर्समध्ये लक्षणीय वाढ होत असल्याचे सांगितले आहे. चालू वर्षाच्या शेवटी १.५ अब्ज युझर्सची विंडोजच्या खात्यात भर पडणार असून अंडरोईडचे सध्या ६० कोटी ८० लाख युझर्स आहेत. २००८ मध्ये अंडरोईड ऑपरेटिंग सिस्टिम बाजारपेठेत दाखल झाली असून सध्या दोन तृतीयांश स्मार्टफोनवर अंडरोईड वापरले जात आहे. टॅबलेट संगणक बाजारपेठेत अँडॉइडने अल्पावधीत दुसरे स्थान पटकाविले आहे.
इंटरनेटवरील सर्च मार्केटटमध्ये निःशुल्क मिळणार्या सॉफ्टवेअरमुळे गुगलला तंत्रज्ञानाच्या बाजारपेठेत मोठी भरारी घेता आली. चालू वर्षाच्या तिसर्या तिमाहीत पर्सनल संगणकाच्या युझर्समध्ये जगभरात ८ टक्क्यांनी घट झाली आहे. २००१ पासूनची ही सर्वांत मोठी घट आहे. बेसिक कॉम्प्युटिंगसाठी टॅबलेट आणि स्मार्टफोनचा वापर वाढल्यामुळे पर्सनल संगणकाच्या संख्येत घट झाली आहे. गेल्या काही दशकांमध्ये पर्सनल संगणक बाजारपेठेवर विंडोजचे वर्चस्व होते. परंतु, तंत्रज्ञान क्षेत्रातील बदलांच्या गतीशी सुसंगत राहण्यात कमी पडल्याने विंडोज जरा मागे पडल्याचे दिसून येत आहे.