’बर्फी’

५० च्या दशकात चित्रपटातील नायकाचा जन्म होतो. त्याच्या जन्मावेळी घरी मर्फी रेडिओ सुरु असतो. ’मर्फी’ ट्रान्जिस्टर ब्रॅण्डवर त्या काळी एका गोड मुलाचे चित्र असायचे. बर्फीच्या नायकाचे नाव मर्फी. चित्रपटातील नायक मुकबधिर आहे .जेव्हा नायक आपले नाव मर्फी असे सांगतो, तेव्हा सगळ्यांना मर्फीऐवजी बर्फी असे ऐकायला येते. त्यामुळे मर्फीऐवजी नायकाचे नाव बर्फी असे पडते. पूर्ण चित्रपटात फक्त एकदाच नायक ऐवढे बोलताना दिसतो. मुकबधिर लोक भलेही बोलू शकत नसले, तरीदेखील इशार्‍यांनी आणि तोंडाने आवाज काढून आपली गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतात. मात्र असे करताना कदाचित विचित्र वाटेल हे नायकाला माहित असावे. म्हणून त्याने असा काही प्रयत्न करायचा टाळला आहे.

चित्रपट पडद्यावर सुरु होण्यापूर्वीच प्रेक्षक या नायकाशी एकरुप होतात. शारीरिक व्यंग दाखवल्यामुळे प्रेक्षकांचे प्रेम मिळते हे दिग्दर्शकाला ठाऊक आहे. बर्फी मस्तीखोर आहे. तो वाचू आणि लिहू शकतो. दिसायलाही स्मार्ट आहे. मात्र तो कामकाज करत नाही. त्याच्या शहरातील इन्सेक्टरचे पूर्ण करिअर त्याचा पाठलाग करण्यात जाते. यावरुन १९७० च्या दशकात दार्जिलिंगमध्ये गुन्हेगारीची काय स्थिती असावी याचा अंदाज आपल्याला येतो.

इन्स्पेक्टर (सौरभ शुक्ला) कीस्टोन कॉप्सचा एक भाग आहे. चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीच्या काळातील हॉलिवूडमधील मुकपट कॉमेडी चित्रपटातील काम न करणार्‍या पोलिसांना कीस्टोन कॉप्स असे म्हटले जात होते. बर्फीचे (रणबीर कपूर) हावभाव नक्कीच चार्ली चॅप्लिन यांच्यापासून प्रेरित आहेत. चार्ली चॅप्लिन मुकपट चित्रपटांमधील सर्वाधिक प्रभावशाली अभिनेते होते. विशेष म्हणजे १९५० च्या दशकात रणबीरचे आजोबा राज कपूर यांच्या चित्रपटांवरही चार्ली चॅप्लिनचा प्रभाव दिसत होता. हा चित्रपट जास्तीत जास्त मुकपटच वाटतो. कारण या चित्रपटात जगाला मुक-बधिर नायकाच्या दृष्टीने दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

या चित्रपटाला मुख्य धारेतील चित्रपटांमधील एक साहसी चित्रपट म्हणावा लागेल. चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला भावावा आणि प्रेमातील खरेपणा आपल्या डोळ्यांपुढे उभा राहावा हा चित्रपटाचा मुळ उद्देश आहे. तसे पाहता अशा चित्रपटांचा उद्देश सफल होण्यासाठी एक सशक्त पार्श्वभूमी असणे गरजेचे असते. उदाहरण द्यायचे झाल्यास ’लाईफ इज ब्युटीफूल’ हा कॉमेडीबरोबरच एक पॉलिटिकल चित्रपट होता. किंवा ’द आर्टीस्ट’चेच उदाहरण घ्या. या चित्रपटाने मुकपट आणि टॉकीजच्या सुरुवातीच्या काळाला ट्रिब्यूट देण्याबरोबरच अभिनेत्यांचा उदय आणि अस्तावर प्रकाश टाकला होता. या चित्रपटांमध्ये असलेली सशक्त पार्श्वभूमी ’बर्फी’ला नाहीये. त्यामुळे हा चित्रपट एका मुकबधीर व्यक्तीचा आपल्या स्वकीयांच्या शोधाचा एक साधा चित्रपट ठरतो.

बर्फीचे एका सुंदर मुलीवर (इलियाना डीक्रूज) प्रेम जडते. या मुलीचा साखरपुडा झाला आहे. ती श्रीमंत घराण्यातील आहे. तर नायक गरीब घरातला आहे. मुलीची आई लेडी चॅटर्जीकडून (रुपा गांगुली यांनी साकारलेल्या भूमिकेचे नाव कादचित डीएच लॉरेंस यांच्या ’लेडी चॅटर्लीज लव्हर’ या कांदबरीवर आधारित असावे.) एका गरीब मुलाला दिल्या जाणार्‍या हीन वागणूकीवरुन आपल्याला या महिलेचा स्वभाव कसा आहे ते कळतो. बर्फीचे या श्रीमंत मुलीनंतर आणखी एका मुलीशी प्रेम जडते. यावेळी ही मुलगी मानसिक रुग्ण आहे. या मुलीची आई दारुडी आणि वडील जुगारी आहेत. ऑटीस्टिक मुलीची ही भूमिका प्रियांका चोप्राने साकारली आहे.

या आव्हानात्मक भूमिकेसाठी रणबीर आणि प्रियांकाच्या निवडीवरुनच आपल्या लक्षात येते की, या दोघांनीही आपली भूमिका जिवंत करण्यात कोणतीही कसर शिल्लक ठेवलेली नाही. या दोघांनीही आपल्या चाहत्यांना निराश केले नाही.
दिग्दर्शक अनुराग बासूंचे सौंदर्य ज्ञान उच्च कोटीचे असून दर्शनीय सिनेमा तयार करणार्‍या मोजक्या भारतीय दिग्दर्शकांपैकी ते एक आहेत. संजय लीला भन्साळी आणि मणिरत्नम यांच्या श्रेणीत ते येतात. अडचण फक्त एवढीच आहे की, कधी कधी दिग्दर्शक आपल्या प्रेक्षकांना चित्रपटाचे सौंदर्य दाखवण्यातच आपली पूर्ण शक्ती पणाला लावतात. या चित्रपटातील एका सामान्य दृश्यात रस्त्यावरुन एक कार जात असते. मात्र या साध्या दृश्यातही रस्त्याच्या पलीकडे आपल्याला व्हायलिन वादकांचा एक समूह दिसतो.

अनुराग बासूंचा ’काईटस’ हा चित्रपट वाईट स्क्रिप्टमुळे पडला होता. ’बर्फी’ची न जमलेली बाजू म्हणजे याचे एडिटिंग. लांबलचक शॉटसला जोडून एक चांगला चित्रपट तयार करणे हे संपादकाचे (एडिटर) काम असते. मात्र संपादकाने हे लक्षात ठेवायला हवे की, चित्रपटाला एक लय असावी, प्रत्येक दृश्य प्रभावीपणे पुढे सरकावे, दृश्य मोठे असो किंवा छोटे प्रत्येक दृश्याची संगती योग्य असायला हवी. या चित्रपटात उत्कृष्ट संकलनाचा अभाव जाणवतो. बासूंच्या ’लाईफ इन ए मेट्रो’ या चित्रपटात वेगवेगळ्या सहा कहाण्या असूनही चित्रपटाचे संकलन उत्कृष्ट होते.

बर्फी नायिकेवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी तिची आई लेडी चॅटर्जीला भेटतो. त्यासाठी नायक नायिकेच्या घरी येतो. तिथे नायिकेचा होणारा नवराही हजर असतो. नायक आपले प्रेम पत्र पुढे करतो. नायिकेचा होणारा नवरा ग्रामोफोनचा आवाज वाढवतो. आपण त्याच्या चमकणार्‍या चष्म्यामागे लपलेले त्याचे डोळे स्पष्ट बघू शकतो. नायक मदत मागायला आला आहे, असे नायिकेच्या वडिलांना वाटते. नायकाला अपमानित होऊन परतावे लागते. तो आपल्या प्रेयसीपुढे आपली निराशा व्यक्त करतो. हे दृश्य जवळपास दोन मिनिटे दिसते. पूर्ण दृश्यावर शांततेचा पडदा पडलेला आहे. हा एक अनोखा क्षण आहे. प्रेक्षकांवर आपली छाप पाडणारे असे जिवंत दृश्य फारच कमी चित्रपटांमध्ये पाहायला मिळते. त्यामुळे या चित्रपटावर भरपूर मेहनत घेतली गेल्याचे स्पष्ट दिसते. फक्त वाईट एकाच गोष्टीचे वाटते की हा चित्रपट छोट्या छोट्या क्षणाला जोडून एक मार्मिक सिनेमाई अनुभव देत नाही. पण तरीसुद्धा ही ’बर्फी’वर्ख लावल्याने चाखण्यासारखी झाली आहे

Leave a Comment