
नवी दिल्ली, २५ ऑक्टोबर-राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरींवर होत असलेले भ्रष्टाचाराचे आरोप, येडियुरप्पांची नवा पक्ष काढण्यासाठी सुरू असलेली लगबग यामुळे अडचणीत आलेल्या भारतीय जनता पक्षाला दिलासा देणार्याही काही घटना घडत आहेत. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्लाह यांच्या पत्नी पायल सिंग भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे.उमर आणि पायल सध्या वेगळे राहतात. पायल या दिल्लीमध्ये असतात. त्या राजकारणात उतरण्याच्या प्रयत्नात आहेत. भाजपमध्ये येण्यासाठी त्यांनी अनेकवेळा नितीन गडकरी यांची भेट घेतल्याचेही वृत्त आहे.
मात्र, भाजप नेत्यांनी याबाबत काही सांगण्यास नकार दिला आहे. पायल उत्तर प्रदेशच्या बिजनौर मतदार संघातून निवडणूक लढवू इच्छितात, असे म्हटले जाते. बिजनौरमध्ये त्या राहत फाऊंडेशन या संस्थेमार्फत एक शाळा चालवत आहेत. त्याचबरोबर अपंगासाठीही त्या कार्यरत आहेत.
