पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून नरेंद्र मोदी ’आऊट’; संघ व भाजपचे एकमत

नवी दिल्ली, २३ ऑक्टोबर-भाजपप्रणित एनडीए आघाडीच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीच्या शर्यतीतून नरेंद्र मोदी यांचे नाव सध्यातरी मागे पडले आहे. भाजपमधील वरिष्ठ नेत्यांनी यावर विचारविनिमय केल्यानंतर संघानेही त्याला सहमती दिल्याचे कळते. भाजप नेत्याचे म्हणणे आहे की, जर मोदींना पंतप्रधानपदासाठी प्रोजेक्ट केले तर भ्रष्टाचार आणि महागाई यासारखे महत्त्वाचे मुद्दे बाजूला पडतील. तसेच त्यावेळी हिंदूत्व विरुद्ध धर्मनिरपेक्षता यावर राजकारण सुरु होईल. अशावेळी एनडीएची आघाडी मजबूत होण्यास अडचणी येतील. कारण जदयू सारखे एनडीएचे घटक पक्ष दूर होण्याची भीती आहे.

मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवरुन राष्ट*ीय स्वयंसेवक संघ गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्यांबरोबर चर्चा करीत होता. यात लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज, राज्यसभेचे विरोधी पक्षनेते अरुण जेटली, पक्षाचे माजी अध्यक्ष राजनाथ सिंग आणि मुरलीमनोहर जोशी तसेच भाजपच्या संसदीय पक्षाचे अध्यक्ष लालकृष्ण आडवाणी यांच्याबरोबर संघाचे कार्यवाह भैयाजी जोशी आणि संघाकडून भाजपमधील राजकीय घडामोडींकडे लक्ष ठेवणारे सुरेश सोनी यांनी चर्चा केली. संघ नेत्यांनी भाजपच्या नेत्यांबरोबर चर्चा केली ते सर्व पक्षाचे संसदीय समितीचे सदस्य आहेत. पक्षाची संसदीय समिती पंतप्रधानाचा उमेदवार ठरवते.

जदयू सोडू शकतो साथ- सूत्रांनी सांगितले की, सुषमा स्वराज, अरुण जेटली आणि राजनाथ सिंग यांनी पंतप्रधानपदाच्या दावेदारीत नरेंद्र मोदी यांची योग्यता आणि क्षमता मान्य केली. मात्र, सध्याची राजकीय स्थिती त्यांच्यासाठी योग्य नसल्याचे मत मांडले. भाजपच्या या नेत्यांनी मत मांडले की, आपण मोदींना प्रोजेक्ट केले तर काँग्रेस पुन्हा अल्पसंख्यकांची मते खेचेल तसेच जे पक्ष धर्मनिरपेक्ष असल्याचा दावा करतात त्यांना एकत्र करतील. त्याचा मोठा फटका बसेल. जदयूसारखे धर्मनिरपेक्ष पक्षही मोदींच्या उमेदवारीनंतर दूर जावू शकतात. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मोदींच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीला विरोध केला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या पदासाठी सुषमा स्वराज सर्वात योग्य उमेदवार असल्याचे सांगितले आहे. याबाबत सांगितले जात आहे की, भाजप नेत्यांचे आकलन संघानेही आपल्या ’बौद्धिका’नुसार नरेंद्र मोदी यांच्याबरोबर चर्चा केली आहे. तसेच मोदींना ते मान्य असल्याचे कळते. मोदी यांनी संघाकडे आपण स्वतः कधीही पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असल्याचे म्हटले नसल्याचे सांगितले आहे.

Leave a Comment