नवी दिल्ली दि.२०- दररोज नव नवे घोटाळे आणि भ्रष्टाचाराची उघडकीस येत असलेली प्रकरणे, महागाई, इंधन दरवाढ, सबसिडी रद्द करण्याचा निर्णय, परदेशी गुंतवणुकीची परवानगी अशा अनेक बाबींनी सध्या सर्वसामान्यांच्या रोषास पात्र ठरत असलेल्या काँग्रेसने पक्षाचे नितीधैर्य उंचावावे आणि युवा नेते युवराज राहुल गांधी यांचा मेकओव्हर केला जावा यासाठी विविध कल्पना अजमावून पाहण्याचे धोरण अवलंबिले असून स्वतंत्र सामाजिक विकास मंत्रायल स्थापन करण्याविषयी गंभीरपणे विचार सुरू केला आहे असे खात्रीलायक वृत्त आहे.
राहुल गांधी यांना देशाचा नेता म्हणून प्रोजेक्ट करतानाच आम आदमीचे हित पाहणारा नेता अशीही त्यांची छबी निर्माण केली जावी असा अनेक काँग्रेस ज्येष्ठ नेत्यांचा सल्ला आहे. यासाठी सध्याच्या सामाजिक कल्याण, आदिवासी दलित कल्याण, ग्रामीण विकास, सामाजिक विकास व इन्फ्रास्ट्रक्चर या मंत्रालयांचे अधिकार थोडे कमी करून त्यातूनच सामाजिक विकास हे नवे मंत्रालय स्थापले जाणार असून त्याची धुरा राहुल गांधी यांच्याकडे दिली जाईल असे संकेत या नेत्यांनी दिले आहेत. असे मंत्रालय स्थापण्यात सरकारला यश आले तर अनेक सामाजिक हिताची कामे एकाच छताखाली होऊ शकणार आहेत असेही सांगण्यात येत आहे.
पंतप्रधान आणि आघाडी सरकारने सुधारणांचे धोरण अवलंबिले आहे. मात्र गुंतवणूक व व्यवसायवृद्धीसाठी पाश्चमात्य जगाकडे मान्यतेसाठी सतत पाहावे लागत आहे. जागतिक बँकेने घालून दिलेली नवी मार्गदर्शक तत्त्वे पाळावी लागत आहेत या सार्यात हे मंत्रालय बॅलन्सिंग फॅक्टर म्हणून काम करेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
अर्थात हे सारे निर्णय आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यांपुढे ठेवूनच घेतले जात आहेत आणि आगामी निवडणुकांत राहुल गांधी यांची प्रतिमा अधिक ठळकपणे जनमानसावर उमटावी असाही त्यामागे उद्देश आहे असेही या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.