निसर्गाने पुरुष आणि स्त्री या दोघांनाही वेगळे घडवलेले आहे. परंतु या वेगळेपणातून पुरुषांनी विषमता निर्माण केली आहे. महिला शारीरिकदूष्ट्या सबल नसल्यामुळे तिला कायम अबला ठरवून टाकलेले आहे आणि तिच्यावर अनेक प्रकारची बंधने लादून तिला कायम उपेक्षित करून टाकले आहे. त्यामुळे मानवी जातीच्या प्रगतीमध्ये एक मोठा अडथळा निर्माण झालेला आहे. मानवी जात प्रगती करत आहे असे मानवाचे तरी मत आहे. परंतु या प्रगतीचे देशादेशातले निकष वेगळे असतात. त्यानुसार त्या त्या देशामध्ये मनुष्यबळाच्या विकासाचे विश्लेषण केले जाऊ शकते. परंतु मनुष्य बळाच्या विकासाचा निदान एक तरी निकष असा आहे की, जो सार्या जगामध्ये समान आहे आणि तो म्हणजे महिलांची प्रगती किंवा महिलांचे सबलीकरण.
देश कोणताही असो त्या देशातल्या लोकसंख्येमध्ये ५० टक्के लोकसंख्या असलेल्या महिलांकडे त्या देशातले पुरुष कोणत्या दृष्टीकोनातून पाहतात आणि आपल्याला जन्म देणार्या या स्त्री शक्तीला माणूस म्हणून वागवतात की नाही यावरून तो देश किती प्रगत आहे हे ठरवले जावे, ही गोष्ट आता सर्वमान्य झालेली आहे. त्यामुळेच विविध देशांमध्ये अबला असलेल्या महिलांना सबला करण्याचे प्रयत्न चाललेले आहेत. भारतात तर महिलांची अवस्था फार वाईट आहे. आपण आपल्या परंपरेने नवरात्रामध्ये शक्तीची उपासना करतो. शक्ती म्हणजे स्त्री असे म्हणत देवीची प्रतिष्ठापना करतो पण आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये महिलांचे स्थान दुय्यम असते. काही ठिकाणी तर केवळ दुय्यम नव्हे तर अतिशय हिणकस असे स्थान महिलांना मिळते.
एका बाजूला देवीची आराधना, दुसर्या बाजूला महिलांची हेटाळणी. एका बाजूला शक्ती देवीसमोर कर्मकांडाचा अतिरेक आणि दुसर्या बाजूला स्त्री भ्रुणाच्या हत्या अशी ढोंगबाजी भारतामध्ये सुरू असल्यामुळे भारताचा महिला सबलीकरणाच्या बाबतीत जगात फार खालचा क्रमांक आहे. जगातल्या १२८ देशातील महिला सबलीकरणाचा अभ्यास करण्यात आला असून त्या देशांच्या मांदियाळीत भारताचा क्रमांक ११५ वा आला आहे. बूज अॅन्ड कंपनी या कंपनीने जगभरात केलेल्या अभ्यासाच्या अंती भारतीयांच्या डोळ्यामध्ये अंजन घालणारा हा निष्कर्ष नेमका शक्ती देवतेच्या उपासनेचे नवरात्र सुरू असतानाच जाहीर झाला आहे.
भारतामध्ये महिला शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात आघाडीवर येत आहेत. परंतु त्यांना ही आघाडी घेताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे भारतातील पुरुषांच्या प्रगतीच्या तुलनेत महिलांची प्रगती कमी होते. देशाच्या लोकसंख्येच्या ४९ टक्के एवढी महिलांची संख्या आहे. परंतु वट्ट राष्ट्रीय उत्पन्नातला महिलांचा वाटा केवळ २७ टक्के आहे. भारतातल्या महिला घराच्या बाहेर पडल्या आहेत, परंतु बाहेर जाऊन घरी येईपर्यंत त्या सुरक्षित राहतील याची खात्री देता येत नाही हेही वास्तव आहे.
पाहणी केलेल्या १२८ देशांपैकी ४१ देश महिला सबलीकरणाच्या बाबतीत नियोजनबद्धपणे प्रयत्न न करणारे देश म्हणून उल्लेखित केले गेले आहेत, त्यात भारताचा समावेश आहे. भारत देश महाशक्ती होण्याच्या मार्गावर आहे आणि भारतात शिक्षणाचे प्रमाण महिलांमध्ये वाढत आहे. अशा अवस्थेत सुद्धा भारताचा क्रमांक एवढा खाली का यावा, हा आपल्याला अस्वस्थ करणारा प्रश्न आहे. जग कितीही पुढे जाईल, भारतातल्या महिला सुद्धा शिक्षण घेतील, परंतु महिलांच्या सबलीकरणात भारत बरीच वर्षे मागेच राहणार आहे ही कटु वस्तुस्थिती आपण समजून घेतली पाहिजे.
या वस्तुस्थितीचे कारण आपल्या देशातल्या विशिष्ट रुढी, परंपरा आणि जातीयवाद यांच्यामध्ये दडलेले आहे. या तीन गोष्टींपासून आपली सुटका होणार नाही तोपर्यंत आपल्या देशातल्या महिलांचे सबलीकरण अशक्य ठरणार आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी की, समाजात शिक्षणाचे प्रमाण प्रचंड वाढलेले असून सुद्धा रुढी, परंपरा आणि जातीयवाद यांचे प्रमाण कमी होण्याऐवजी ते वाढत चालले आहे आणि त्यामुळेच महिला शिकल्या, नोकरी करायला लागल्या, बचत गट स्थापन करून व्यवसाय करायला लागल्या, ५० टक्के आरक्षणामुळे नेत्या झाल्या पण त्या सबला झाल्या नाहीत.
भारतातल्या महिलांमध्ये उच्चवर्णीय महिला आणि बहुजन समाजातल्या तसेच दलित आदिवासी महिला असे दोन भाग पडतात. भारतीय तत्वज्ञानाने महिलांना शुद्रांचे स्थान दिलेले आहे. त्यामुळे एखादी बाई उच्च कुळात जन्माला आली तरी सुद्धा तिला शुद्र समजले जाते. ती शिकली तरी सुद्धा तिला पुरुषांच्या बरोबरीचा दर्जा दिला जात नाही. आपल्या परंपरेने पुरुष श्रेष्ठ असतो ही शिकवण दिलेली आहे आणि तिच्या बाहेर जाण्यास पुरुषच काय पण महिला सुद्धा तयार नाहीत.
बहुजन समाजातल्या महिलांचा प्रश्न तर त्यापेक्षा गंभीर आहे. त्यांना मुळात स्त्री म्हणून पुरुषांपेक्षा खालचे स्थान दिले जातेच, परंतु देशातल्या जातीच्या उतरंडीमध्ये ती खालच्या उतरंडीवर असल्यामुळे तिला त्याही आधारे दुय्यम स्थान मिळत असते. एकंदरीत तिची दोन बाजूंनी गोची होत असते. तिला पुरुषांचाही त्रास असतो आणि वरिष्ठ जातींचाही जाच सहन करावा लागत असतो. तिची कष्टाची पद्धत, शिक्षण, आरोग्य, नोकरी या सर्व गोष्टींमध्ये जात आणि पुरुष या दोन जोखडांमधून तिला वाटचाल करावी लागते. जातीयवाद हे केवळ भारताचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे भारतातल्या बहुसंख्य महिलांच्या मुक्तीचा लढा दुहेरी आणि अवघड होऊन बसलेला आहे.