टीम अण्णा मध्ये केजरीवाल समर्थकांना जागा नाही

पुणे दि.२० – अरविंद केजरीवाल आमचा शत्रू नाही मात्र आमचे मार्ग वेगळे आहेत. अर्थात आम्हा दोघांचेही ध्येय एकच आहे असे थोर समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा सांगितले आहे. गेल्या आठवड्यात अण्णांवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली आहे. या शस्त्रक्रियेनंतर केजरीवाल यांनी गडकरी, वद्रा यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत अण्णांना विचारले असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रीया देण्यास नकार दिला. 

अण्णा म्हणाले माझ्या डोळ्याचे ऑपरेशन झाल्यामुळे गेल्या आठवड्यात काय घडले याची मला कल्पना नाही. मी दूरदर्शन पाहिले नाही अथवा पेपरही वाचलेले नाहीत त्यामुळे केजरीवाल यांनी जनतेसमोर नक्की काय मांडले आहे त्याची मला कल्पना नाही.

यावेळी नवीन टीम अण्णांबाबत विचारले असता अण्णांनी तप्तरतेने केजरीवाल यांचे समर्थन करणार्‍या कुणालाच नवीन टीम अण्णात जागा नसल्याचे मात्र स्पष्ट केले. नुकतीच अण्णांनी किरण बेदी आणि विश्वंभर चौधरी यांचीही भेट घेतली आहे. नवीन कमिटीत समाजाच्या सर्व स्तरांतील ५० सदस्य निवडले गेल्याचे अण्णा म्हणाले. ते म्हणाले की नवीन टीमची घोषणा केल्यानंतर ही चळवळ खर्‍या अर्थाने जोरात सुरू होईल.

नवीन टीम अण्णाचे मुख्यालय अण्णांच्या गावी म्हणजे राळेगण सिद्धी येथेच ठेवण्यात येणार आहे. यामुळे अण्णांचे चळवळीवर थेट नियंत्रण राहू शकणार आहे. जनलोकपाल आंदोलन दिल्लीतून चालविले जात होते. या समितीपुढे आणि चळवळीपुढे कोणताही राजकीय अजेंडा नाही असे अण्णांनी लेखी दिले असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले आहे. राळेगणमधील मुख्यालयाच्या संगणकीकरणाचे काम सुरू असल्याचेही याच सूत्रांनी सांगितले.

 

Leave a Comment