छोट्या शहरांत मोठे गुन्हे

शहरांत गुन्हयांचे प्रमाण वेगाने वाढत आहे असे  सरकारी अहवालात म्हटले आहे. ते खरेही आहे पण त्यातल्या त्यात सूक्ष्मात जाऊन विचार करायला लागल्यास असे आढळते की, गुन्हयांचे प्रमाण लहान शहरांत जास्त आणि मोठ्या शहरांत कमी वेगाने वाढत आहे. काही महानगरांत तर गेल्या चार पाच वर्षात गुन्हेगारी कमी झाली आहे. दिल्ली ही केवळ देशाचीच नव्हे तर गुन्हयांचीही राजधानी आहे हे दिसतेच आहे पण २०११ साली या राजधानीत दखलपात्र गुन्ह्यांचे प्रमाण घटले आहे.  गेल्या पाच वर्षात दिल्लीतली गुन्हेगारी थोडी थोडी कमीच  झाली आहे. हाच प्रकार हैदराबाद शहरातही दिसून आला आहे. या शहरात पाच वर्षात गुन्हे घटले आहेत. 

गुन्हयांचे प्रमाण सर्वात वेगाने वाढणार्‍या शहरांत कोची या शहराचा क्रमांक लागतो. हा वेग प्रचंड आहे. २००६ साली या शहरात ५ हजार ६९९ गुन्हे नोंदले गेले होते पण २०११ साली ही संख्या ३४ हजारावर गेली. दिल्लीत खुनांची  संख्या वाढली आहे हे निःसंशय आहे पण त्यापेक्षा पुणे आणि  कानपूर या दोन शहरांनी खुनांच्या प्रकारात दिल्लीपेक्षा अधिक वेग गाठला आहे. अशी तुलना करताना गुन्हयांची निव्वळ एकूण संख्या पाहिली जात नाही तर त्यांचे लोकसंख्येशी असलेले प्रमाण मोजले जात असते. 
तशी लोकसंख्येच्या संदर्भात तुलना केली असता आग्रा आणि कानपूर ही दोन शहरे खुनात आघाडीवर आहेत असे लक्षात येते. केवळ आग्रा आणि  केवळ कानपूरच नाही तर इतरही अनेक छोटया शहरांत खुनांची संख्या लोकसंख्येच्या तुलनेत फारच जास्त आहे.

जबलपूर हे काही फार मोठे शहर नाही पण, त्या शहरात २०११ साली बलात्काराच्या १०० फिर्यादी नोंदल्या गेल्या. आग्रा शहरातही या तुलनेत अधिक प्रकरणे नोंदली गेली आहेत. तिथे गतवषीं बलात्काराच्या ६० फिर्यादी नोंदल्या गेल्या आहेत. भोपाल आणि इंदूर या दोन शहरांतही  लोकसंख्येच्या तुलनेने बलात्काराच्या फिर्यादी जादा आहेत. 

अपहरणाच्या बाबतीत त्यातल्या त्यात तरुण मुलींच्या अपहरणात उत्तर भारतातल्या सात शहरांनी पहिला क्रमांक पटकावला आहे. या साताशिवाय बंगलूर, अहमदाबाद आणि मुंबई या तीन शहरांनीही अपहरणाच्या बाबतीत पहिल्या दहा शहरांत क्रमांक मिळवला आहे. मोटार कार पळवण्याच्या बाबतीत भारत जगात आघाडीवर आहे आणि आग्रा शहर भारतात पहिल्या क्रमांकावर आहे. दिल्ली, मुंबई आणि बंगलूर याही शहरांत मोटार कार चोरीचे प्रमाण मोठे आहे.

 

Leave a Comment