कृत्रिम पेट्रोलची यशस्वी निर्मिती

लंडन दि. २० – मानवाच्या शरीरातील रक्तापासून अनेक अवयव सिंथेटिक पदार्थांपासून बनविले जात असतानाच आता जगभरात चिंतेचा विषय असलेल्या इंधनाची निर्मितीही सिंथेटिक पद्धतीने करण्यात यश मिळविल्याचा दावा ब्रिटीश कंपनी एअर फ्यूएल सिडीकेशनने केला आहे. हा शोध म्हणजे ब्रिटनचा शिरपेचात आणखी एक तुरा असल्याचे मत इन्स्टिट्यूट ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे अध्यक्ष स्टीफन टेटलेव्ह यांनी व्यक्त केले आहे. हे तंत्रज्ञान लंडनमध्ये नुकत्याच पार पडलेल्या लंडन अभियांत्रिकी परिषदेत सादर करण्यात आले.

एअर फ्यूएल सिंडीकेशन या कंपनीने या प्रयोगात एअर कॅप्चर तंत्रज्ञानाचा वापर केला असून हवेतील कार्बन डाय ऑक्साईड वेगळा काढून व त्याचा विजेशी संयोग करून बनविलेल्या मेंथॉल पासून हे पेट्रोल तयार केले आहे. कार्बन डाय ऑक्साईड आणि सोडियम हायडाॅक्साईड यांचा संयोग करून त्या संयुगाचे विद्युत प्रवाहीकरण केल्यानंतर तयार होणार्‍या जलबाष्पापासून मेंर्थालची निर्मिती होते. हा मेंथॉल गॅसोलिन रिअॅक्टरमधून पास केल्यावर त्यापासून पेट्रोल मिळते. यात कार्बन वायूचा वापर केला जात असल्याने कार्बन उर्त्सजन रोखणे शक्य आहे व परिणामी जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदलाचे दुष्परिणाम कमी करणेही शक्य असल्याचे उत्पादकांचे म्हणणे आहे.

कंपनीने गेल्या तीन महिन्यात या पद्धतीने पाच लिटर पेट्रोल तयार केले असल्याचा दावा केला आहे. दोन वर्षात दररोज १ टन पेट्रोल निर्मितीचा प्रकल्प कंपनी उभारणार आहे आणि पुढील १५ वर्षात याची क्षमता रिफायनरी इतकी मोठी केली जाणार आहे असेही सांगण्यात येत आहे. अपारंपारिक उर्जेचा वेगळ्या प्रकारे वापर या तंत्रज्ञानात केला असल्याचाही कंपनीचा दावा आहे.