काँग्रेस, राष्ट्रवादीला जोड्याने मारा: आदित्य ठाकरे

मुंबई: शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची तुलनेने संयत वक्तृत्व शैली न अनुसरता त्यांचे चिरंजीव युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आपले आजोबा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि काका महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांची आक्रमक वक्तृत्वशैली आत्मसात केल्याचे दाखवून दिले. संभाजीनगर न म्हणता क्रूर बादशहा औरंगजेब याच्या नावावरून औरंगाबाद म्हणणार्‍या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जोड्याने मारा; असा अस्सल ठाकरी टोला त्यांनी युवासेना वर्धापन दिनाच्या मेळाव्यात लगावला.

औरंगाबाद हे नाव क्रूर दडपशाह औरंगजेब याच्या नावावरून देण्यात आले आहे. या औरंगजेबाने अनेक हिंदू मंदिरे आणि देवस्थानांचा विध्वंस केला. अशा बादशहाच्या नावाच्या औरंगाबादपेक्षा या औरंगजेबाला पळताभुई थोडी करणार्‍या छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने दिलेल्या संभाजीनगर याच नावाचा वापर होणे आवश्यक आहे; असे मत ठाकरे यांनी व्यक्त केले. संभाजीनगर असा उल्लेख न करणार्‍या सत्ताधार्‍यांना जोड्याने मारा; असेही ते म्हणाले.

युवासेनेचा सन २०१४ चा वर्धापनदिन आपण मंत्रालयाच्या दारात साजरा करू. त्यावेळी राज्यात महायुतीची सत्ता असेल; असा विश्वासही ठाकरे यांनी व्यक्त केला.

Leave a Comment