महाराष्ट्रात कागझीने बनविली जिहादी फौज

पुणे दि.१७- पुण्यातील जर्मन बेकरी आणि नंतर नुकत्याच झालेल्या जंगली महाराज रोडवरील साखळी बॉम्बस्फोटात महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या लष्करे तैयबाच्या फैयाज कागझी याने मराठवाड्यात गेल्या दहा वर्षात किमान १०० जणांची जिहादी फौज बनविली असल्याची माहिती दिल्ली पोलिसांना मिळाली आहे.

पुणे बॉम्बस्फोट प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेले संशयित, पुण्याचा फिरोज, औरंगाबादचा असद जमशीद व नांदेडचा इम्रान वाजिदखान यांच्या चौकशीत ही माहिती उघड झाली असल्याचे समजते.
पोलिसांनी या तिघांकडे केलेल्या चौकशीत कागझी यानेच पुण्यातील जंगली महाराज रोडवरील साखळी स्फोटांची सूत्रे सौदीतून हलविली असल्याचे स्पष्ट झाले आहे शिवाय जर्मन बेकरी स्फोटाचा सूत्रधारही तोच होता असेही समजले आहे. कागझी आणि सौदीतून दिल्लीत आल्यावर अटक करण्यात आलेला अबू जुंदाल हे दोघेही २००२ पासूनच लष्करेच्या संपर्कात होते. गुजराथेतील गोध्रा हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी त्यांनी जिहाद पुकारला होता आणि त्यातूच जिहादींची फौज उभी करण्यात आली होती असेही समजते.

२००६ सालीच कागझी भारतातून सीमापार झाला होता. याच काळात औरंगाबादेत दहशतवाद विरोधी पथकाने पकडलेला प्रचंड मोठा शस्त्रसाठा जुंदाल आणि कागझीनेच औरंगाबाद येथे आणला होता. त्यात १८ एके ४७, ५० हातबॉम्ब, ४३ किलो स्फोटके, दोन तलवारी तर ३२०० जिवंत काडतुसे होती असेही या चौकशीत निष्पन्न झाले आहे. या हत्यारप्रकरणात तेव्हा पोलिसांनी २१ जणांना अटक केली होती तर चार जण फरारी झाले होते.

 

Leave a Comment