चव्हाणांचे वर्चस्व कायम

नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. तिथे राष्ट्रवादी काँग्रेसने आपले बळ पणाला लावले होते, परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. या निवडणुकीमध्ये काँग्रेसला राष्ट्रवादीच पराभूत करू शकतील असे चित्र निर्माण करण्यात आले होते. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसला चौथ्या जागेवर समाधान मानावे लागले. या पक्षाच्या नेत्यांनी आपला पराभव मान्य करण्याऐवजी काँग्रेसने पैशाचा जोर दाखवून विजय मिळवला, असा आरोप केला आहे. परंतु या आरोपात काही तथ्य नाही. कारण काँग्रेस पक्षाने एवढा पैसा वाटून विजय मिळवला असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून काँग्रेसच्या पैसा वाटपाच्या विरोधात एखादी तरी फिर्याद दाखल व्हायला हवी होती किवा काँग्रेसतर्फे पैसे वाटप होत असल्याचे निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून द्यावयास हवे होते. 

परंतु निवडणूक प्रचाराच्या दरम्यान असे काही झालेले नाही. पराभवानंतर आत्मचिंतन करण्याऐवजी राष्ट्रवादीचे नेते काँग्रेसवर पैसा वाटपाचा आरोप करत आहेत. कोणी काहीही म्हटले तरी या निवडणुकीत अशोक चव्हाण यांनी आपले नेतृत्व आणि काँग्रेसचा नांदेडमधील वरचष्मा पुरता सिद्ध केला आहे.
एकेकाळी या शहरात शिवसेनेचे वर्चस्व होते. परंतु हे वर्चस्व विद्यापीठ नामांतराच्या प्रश्नातून निर्माण झालेल्या जातीय तणावातून वाढलेले होते. शेवटी नामांतराचा मुद्दा हा तात्पुरताच होता. त्यामुळे त्याचा परिणामही तात्पुरताच टिकला आणि नांदेडसह पूर्ण मराठवाड्यात हळू हळू शिवसेनेचे वर्चस्व कमी होत चाललेले आहे. हे नांदेडमध्ये दिसून आलेले आहे. भारतीय जनता पार्टीला नांदेडमध्ये चंचूप्रवेश करता आला आहे. या सर्व पक्षांना मिळालेल्या जागा या अपेक्षितच आहेत.

परंतु अनपेक्षितपणे मजलीसे इत्तेहादूल मुसलमीन या संघटनेने ११ जागा मिळवल्या आहेत. खरे म्हणजे हा काही मुस्लीम समाजाचा अधिकृत पक्ष नव्हे. या पक्षाचे स्थान हैदराबाद शहरामध्ये चांगले आहे. या पक्षाने हैदराबादची लोकसभेची जागा सातत्याने जिंकलेली आहे आणि त्यांचे सात आमदार आंध्र प्रदेशाच्या विधानसभेत आहेत. हैदराबाद महापालिकेत या पक्षाचे ४३ नगरसेवक आहेत. या पक्षाचा हैदराबाद शहर आणि परिसरात प्रभाव आहे. परंतु अन्यत्र कोठेही हा पक्ष आढळत नाही. महाराष्ट्रात मनसेला जसे पासंगाचे महत्व आहे तसे कधी कधी या पक्षाला आंध्रामध्ये प्राप्त होते. बाकी हा पक्ष प्रभावहीन आहे. 

नांदेड महानगरपालिकेत मात्र या पक्षाने अनपेक्षितपणे ११ जागा जिकल्या. मुस्लीम मतदार हाच या पक्षाचा आधार. त्यामुळे ज्या वॉर्डात मुस्लीम मतदार निर्णायक अवस्थेत असतील अशा २३ वॉर्डात त्यांनी उमेदवार उभे केले होते. त्यातले ११ निवडून आले. मुस्लीम मतदार हा काँग्रेसकडे झुकलेला असतो. त्याला जेथे काँग्रेसला मतदान करायचे नसते तेथे तो मतदार तिसर्‍या आघाडीतल्या पक्षाला मतदान करतो. परंतु नांदेडमध्ये या मतदारांनी काँग्रेसला झिडकारले आणि तिसर्‍या आघाडीचा कोणताही पक्ष जवळ न करता एम.आय.एम. या पक्षाला पुढे करून त्याचे ११ नगरसेवक निवडून दिले. 

खरे म्हणजे मुस्लीम समाज अल्पसंख्यक आहे. त्यांचे एवढे उमेदवार निवडून येणे कधीच शक्य नाही. परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांनी युती न केल्यामुळे झालेल्या मतांच्या फाटाफुटीचा फायदा एम.आय.एम.ला झालेला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आपली नेहमीची भांडणे टाळून, हातमिळवणी करतात तेव्हा, जातीयवादी पक्षांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हातमिळवणी असल्याचे सांगत असतात. हे सांगताना त्यांच्या डोळ्यासमोर हिदूंच्या जातीयवादी संघटना असतात. परंतु नांदेडमध्ये तरी या दोन पक्षांची युती मुस्लीम जातीयवादी पक्ष वाढू नये यासाठी होण्याची गरज होती हे निकालावरून दिसत आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नाते सर्वांना माहीतच आहे. या दोन पक्षांना युती न करता स्वबळावर निवडणूक लढविण्याची उबळ अधूनमधून येत असते. राष्ट्रवादी काँग्रेसला सध्या, आपण महाराष्ट्र काबीज करणारच असा गर्व झाला आहे. म्हणून त्यांनी नांदेडमध्ये काँग्रेसचा पराभव करण्याचे ठरवले. प्रत्यक्षात त्यांचाच पराभव झाला. एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेसला अजून तरी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यांमध्ये फार धडक मारता आलेली नाही हे दिसत आहे. 

अशोक चव्हाण यांनी नांदेड शहराच्या आणि जिल्ह्याच्या विकासासाठी केलेल्या कामांचे फळ त्यांना मिळाले आहे. त्यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाकडे मतदारांनी दुलर्क्ष केले आहे.

महानगरपालिकेत स्पष्ट बहुमत मिळवून त्यांनी जे यश मिळविले आहे त्यामुळे पक्षश्रेष्ठींची त्यांच्यावर कृपा होईल अशी शक्यता सध्या दिसत आहे. काँग्रेस पक्षात अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, परंतु अशोक चव्हाण वगळता कोणाचाही राजीनामा घेण्यात आलेला नाही. त्यामुळे चव्हाण यांचा राजीनामा घेऊन त्यांच्यावर अन्यायच केला गेला आहे, असे वाटते आणि त्यामुळे त्यांचे पुनर्वसन शक्य वाटायला लागले आहे. विशेषतः विलासराव देशमुख यांच्या जाण्याने मराठवाड्याच्या राजकारणात जी नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे तिच्यासाठी तरी अशोक चव्हाणच पात्र आहेत आणि ते त्यांनी नांदेडमध्ये दाखवून दिले आहे.