स्थानिकांना औद्योगीकरणाचा लाभ मिळावा: मुख्यमंत्री

पुणे: औद्योगीकरणाचा लाभ स्थानिक युवकांनाही मिळणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

स्थानिक पातळीवर कुशल मनुष्यबळ विकसित करण्यासाठी वोक्सवॅगन या वाहन उत्पादनातील आघाडीच्या कंपनीने स्थापन केलेल्या अकादमीचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार विलास लांडे, दिलीप मोहिते, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. जोहान चाको, संचालक फ्रेड काप्लर, गेरी डोरीसाझ व्यासपीठावर उपस्थित होते.

स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध होईल; अशा पद्धतीचे अभ्यासक्रम कंपनीच्या अकादमीत चालविले जावेत; अशी पेक्षा व्यक्त करून मुख्यमंत्री यावेळी बोलताना म्हणाले की; महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर होतकरू युवक असून त्यांना योग्य प्रशिक्षण मिळाल्यास विविध क्षेत्रातील उद्योगांना कुशल मनुष्यबळ स्थानिक पातळीवरच उपलब्ध होऊ शकेल. महाराष्ट्रातील बाजारपेठ मोठी असून नागरिकांची क्रयशक्ती सातत्याने वाढत आहे. त्यामुळे राज्यात व्यवसायवृद्धीला मोठा वाव आहे.

वोक्सवॅगन कंपनीने उत्पादन प्रकल्पांबरोबरच डिझाईन आणि संशोधन प्रकल्पही राज्यात सुरू करावा; असे आवाहन करून सरकारच्या वतीने कंपनीला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

Leave a Comment