भुजबळ आणि तटकरेंचा पाय खोलात

मुंबई: आर्थिक गैरव्यवहारांसह अनेक आरोप असलेले मंत्री सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्याबाबतची कागदपत्रे पोलिसांच्या भ्रष्टाचार विरोधी विभागाकडून अंमलबजावणी विभाग आणि आयकर विभागाकडे देण्यात आली असून हे दोन्ही विभागही या मंत्र्यांच्या व्यवहारांची चौकशी करणार आहेत.

सिंचन प्रकल्पातील कथित गैरव्यवहारांसह बनावट कंपन्या आणि जमीन घोटाळ्याचे आरोप असलेले जलसंपदा मंत्री सुनील तटकरे आणि महाराष्ट्र सदनाच्या कामात गैरप्रकार केल्याचा आरोप असलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या व्यवहारांबाबत भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमैय्या यांनी भ्रष्टाचार विरोधी विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या आरोपाच्या पुष्ट्यर्थ त्यांनी काही कागदपत्रेही पोलिसांकडे सुपूर्द केली आहेत.

यापैकी अंमलबजावणी विभागाशी संबंधित असलेली आर्थिक गैरव्यवहारांशी संबधित कागदपत्रे त्या विभागाला; तर बोगस कंपन्या आणि इतर संबंधित कागदपत्रे आयकर विभागाला देण्यात आली आहेत.
त्यामुळे आता अंमलबजावणी विभाग आणि आयकर विभागाचाही ससेमिरा या मंत्रिद्वयाच्या मागे लागण्याची शक्यता आहे.

Leave a Comment