येडीयुरप्पा यांच्यावर आरोपपत्र दाखल

बंगळूरू: भारतीय जनता पक्षापासून फारकत घेऊन नवी समीकरणे जुळविण्याच्या प्रयत्नात असलेले कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्यावर केंद्रीय अन्वेषण विभागाने आरोपपत्र दाखल केले आहे.

कर्नाटकाचे तत्कालीन लोकायुक्त संतोष हेगडे यांनी आपल्या अहवालात येडीयुरप्पा यांच्यावर बेकायदा खाण आणि जमिनीच्या गैरव्यवहारांबाबत ठपका ठेवला आहे. त्यानंतर या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे देण्यात आला. या प्रकरणी तपास करून सीबीआयच्या तपास अधिकार्‍याने मंगळवारी बंगळूरू येथील सीबीआय विशेष न्यायालयात येडीयुरप्पा यांच्यासह त्यांचे चिरंजीव विजयेंद्र आणि खासदार राघवेंद्र, जावई सोहनकुमार यांच्यासह आणखी ९ जणांवर आरोपपत्र दाखल केले आहे.

अवैध खाणकामामुळे सन २००० पासून देशाचे २० हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले असून त्यापैकी १८२७ कोटी रुपयांचे नुकसान कर्नाटकात एकट्या येडीयुरप्पा यांच्या कार्यकाळात झाल्याचा ठपका हेगडे यांनी ठेवला आहे.