शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच

मुंबई: शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे.

शिवाजी पार्क परिसर हे शांतता क्षेत्र असल्याने शिवसेनेचीच सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेने दसरा मेळाव्याला परवानगी नाकारली होती. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने पोलीस आणि न्यायालयाकडे परवानगीची मागणी केली. यापूर्वी दोन वेळा दसरा मेळाव्याला परवानगी देताना ध्वनी पातळी मर्यादेत राखण्याची अट न्यायालयाने घातली होती. मात्र दोन्ही वेळा या अटीचा भंग झाल्याने या वर्षी परवानगी मिळण्याबाबत साशंकता होती. मात्र यावर्षी देखील न्यायालयाने शिवसेनेला शिवाजी पार्क येथे दसरा मेळाव्यास परवानगी दिली आहे.

शिवसेनेप्रमाणेच आपल्या सभेलाही शिवाजी पार्क येथे परवानगी मिळावी; अशी मागणी करणार्‍या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मात्र न्यायालयाने परवानगी नाकारली होती. यावर राज यांनी न्यायालयावर तोंडसुख घेतानाच राज्य सरकार आणि शिवसेनेचे साटेलोटे असल्याची टीका केली होती. आता या निर्णयावर राज काय भूमिका घेतात याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment