नौकचोट, १५ ऑक्टोबर-पश्चिम अफ्रिकी देश मौरीटेनियाचे राष्ट्रपती मोहम्मद औल्द अब्देल अजीज (५५) रविवारी संशयास्पद परिस्थितीत गोळी लागून जखमी झाले. अजीज सुखरूप असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या हाताला गोळी लागली आहे. घटनेबाबत सुरक्षा अधिकारी आणि सरकारचे निवेदन परस्पर विरोधी आहे. माहिती मंत्री हम्दी औल्द महजौब यांनी सांगितले की, राष्ट्रपतींची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
राष्ट्रपतींच्या सुरक्षा अधिकार्यांनुसार अजीज यांच्यावर राजधानी नौकचोटाहून त्वीला येथे जाताना मोटरसायकलस्वाराने हल्ला केला. मात्र सरकारने हल्ल्याचे वृत्त फेटाळले आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार लष्कराच्या जवानांनी चुकून ताफ्यावर गोळीबार केला. सुरक्षा अधिकारी अजीज यांना घेऊन लष्करी रुग्णालयात दाखल झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. राष्ट्रपती आठवड्यातून नेहमी त्वीला येथे जात असत. घटनेवेळी अजीज कार स्वतः चालवीत होते. हल्लेखोराबाबत माहिती मिळू शकली नाही.
अब्देल अजीज यांनी २००८ मध्ये लष्कराच्या बंडानंतर तत्कालीन राष्ट*पति सीदी औल्द चेख अब्दल्लाही यांची सत्ता उलथवून पद मिळविले होते. त्यानंतर जनरल अजीज यांनी लष्कर प्रमुख पद सोडून २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत विजय मिळविला होता.