केजरीवालांच्या प्रश्नांना उत्तर देणार नाही : खुर्शीद

नवी दिल्ली,१५ ऑक्टोबर-अरविंद केजरीवाल यांनी गेल्या काही दिवसांपासून केलेल्या आरोपांचा आज कायदे मंत्री सलमान खुर्शीद यांनी समाचार घेतला.
केजरीवाल यांच्या प्रश्नांची मी उत्तरं देणार नाही. मात्र अपंगांसाठी शिबिरांचे आयोजन केले नव्हते, हे आरोप धादांत खोटे आहेत, असे खुर्शीद म्हणाले. त्यासाठी त्यांनी १७ जुलै २०१० रोजी यूपीमध्ये आयोजित केलेल्या शिबिरांचे फोटो दाखवून पुरावे सादर केले.
तसेच जे बी सिंग हे सुद्धा या शिबिराला उपस्थित होते असे सांगत, त्यांनी सिंग यांच्या फोटोकडे लक्ष वेधले.
याशिवाय आज तक आणि टीव्ही टुडे यांनी केलेले सर्व आरोप निराधार आहेत, असेही खुर्शीद यांनी स्पष्ट केले.
आज तक या वृत्त वाहिनी आणि इंडिया टुडेने खुर्शीद यांच्या या संस्थेत घोटाळा झाल्याचा दावा करत ऑपरेशन धृतराष्ट* हे वृत्त प्रसारित केले होते. पण हे वृत्त प्रसारित होण्याआधी आपण या माध्यमांना घोटाळा झाला नसल्याचे सर्व पुरावे दिले असल्याचाही दावा खुर्शीद यांनी केला.
शिवाय स्टिंग ऑपरेशन आपल्याकडेही आहे, असे सांगून आज तक आणि इंडिया टुडेला खुर्शीद यांनी सरळसरळ आव्हान दिले. जे ७१ लाखांचे अनुदान लाटल्याचा दावा आज तकने केला होता, तोही फेटाळून लावत सर्व निधी खर्च झाल्याचे प्रमाणपत्राची प्रतही सादर केले. त्यामुळे आज तकला कोर्टात खेचण्याचा इशारा त्यांनी दिला.
तसेच भ्रष्टाचाराचे आरोप हे माझ्यावर आहेत, पक्षावर नाहीत, असेही खुर्शीद म्हणाले.
अरविंद केजरीवाल यांनी काही वेळापूर्वीच खुर्शीद यांना पाच प्रश्न विचारले होते. यामध्ये केजरीवाल यांनी खुर्शीद यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्यास राजीनामा देणार का अशी विचारणा केली होती.