कृपाशंकर सिंग यांची तब्बल ५ तास चौकशी

मुंबई: ज्ञात स्त्रोतापेक्षा अधिक माया जमविल्याचा आरोप असलेले काँग्रेस नेते कृपाशंकर सिंग यांची विशेष तपास पथकाने सोमवारी तब्बल पाच तास कसून चौकशी केली.

बेहिशोबी मालमत्तेचा आरोप झाल्यानंतर कृपाशंकर सिंग यांना मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले होते. काही महिन्यापूर्वी विशेष तपास पथक आणि मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा यांनी धाड टाकून सिंग यांची मालमत्ता उघडकीस आणली होती.

दोन दशकापूर्वी कांदा बटाटा विक्रीचा व्यवसाय करणार्‍या सिंग यांच्याकडे आता वांद्रे येथील साईप्रसाद सोसायटीत अडीच कोटी रुपये किंमतीची सदनिका, उत्तर प्रदेश येथील जौनपूर येथे ३ हेक्टर जमीन, पत्नी मालती सिंग यांच्या नावे उत्तरप्रदेशात साडेसात लाखाच्या दोन सदनिका, ठाणे जिल्ह्यातील वाडा येथे १ हेक्टर जमीन, रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे ७ कोटी रुपये किंमतीची २५० एकर जमीन, पनवेलच्या उच्चभ्रू वसाहतीत १ कोटी रुपयांचे दुकान, मुलगा नरेन्द्रमोहन सिंग याच्या नावे वांद्रे येथे ओशन पार्क मध्ये ३ कोटी रुपये किंमतीची सदनिका, तरंग हा तब्बल १५ कोटी रुपयांचा बंगला, विले पार्ले येथे ज्युपिटर सोसायटीत ३ कोटी रुपये किंमतीच्या दोन सदनिका आणि ३ आलीशान बीएमडब्ल्यू कार एवढी मालमत्ता आहे.

Leave a Comment